मुंबई : बनावट सोने बँकेत गहाण ठेऊन १ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात बांगुरनगर पोलिसांना यश आले आहे. गौतम छन्ना राठोड असे या आरोपी खातेदाराचे नाव असून दीड वर्षांपूर्वी याप्रकरणी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालाड येथील राष्ट्रीयकृत बँकेच्या मुख्य व्यवस्थापक महिलेने याप्रकरणी तक्रार केली होती. बँकेने खातेदारासह विविध आकर्षक आणि कमी व्याजदरात सुवर्ण कर्ज योजना सुरु केली होती. या योजनांचा सर्वच खातेदारांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यात काही लोकांनी सोने तारण ठेवून बँकेतून कर्ज घेतले होते. त्याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी मूल्यांकन तज्ज्ञ महिलेला देण्यात आली होती. २९ ऑक्टोंबर २०१८ ते ६ एप्रिल २०२२ या कालावधीत त्या महिलेने सोने तपासून प्रमाणपत्र दिलेल्या काही खातेदारांना बँकेने कर्ज मंजुर केले होते. मात्र खातेदारांनी त्यांच्या कर्जाची मुद्दल आणि व्याजाची रक्कम बँकेत जमा केली होती. त्यापैकी १४ खातेदारांना नोटीस बजावून पंधरा दिवसांत संपूर्ण कर्जाची रक्कम भरा नाहीतर त्यांच्या सोन्याची विक्री करुन रक्कम वसुल केली जाईल, असे सांगण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “BMW चालकानं गाडी पळवली नसती तर…”, वरळीतील अपघातावर मनसेच्या संदीप देशपांडेंची संतप्त प्रतिक्रिया

मात्र नोटीस बजावल्यानंतरही संबंधित खातेदारांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकेच्यावतीने तारण ठेवलेल्या सोन्याचे फेरमूल्यांकन करण्यात आले होते. त्यात चौदा खातेदारांनी दिलेले सोने खोटे असल्याचे समोर आले. याप्रकरणी मूल्यांकन करणाऱ्या महिलेने सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच बँकेच्यावतीने मुख्य व्यवस्थापक महिलेने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. त्यानुसार सोन्याचे मुल्यांकन करणारी महिला व १४ कर्ज घेणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही आरोपींना यापूर्वी अटक झाली होती. या प्रकरणातील आरोपी गौतम राठोड याला पोलिसांनी नुकतीच अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 1 38 crore fraud by depositing fake gold in bank accused arrested mumbai print news css
Show comments