मुंबई : जन्मत:च मानेवर असलेली गाठ हळूहळू वाढू लागल्याने १५ वर्षीय अन्वर खान या मुलाला शीव रुग्णालयात आणण्यात आले. निरनिराळ्या तापसण्या केल्यानंतर ही गाठ २२ बाय ३० सेंटीमीटर असल्याचे लक्षात आले. या गाठीमुळे श्वासननलिका मूळ जागेपासून उजव्या बाजूला झुकल्याने शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल सहा तास शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात यश मिळवले. अन्वर खान (१५) या मुलाच्या मानेवरील गाठ वाढत असल्याने २५ सप्टेंबर रोजी त्याला रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. अन्वरच्या रक्त तपासण्या व एमआरआय काढल्यानंतर ही गाठ लिम्‍फॅटिक सिस्टिम व रक्‍त वाहिन्यांचे जाळे असून, ती २२ बाय ३० सेंटीमीटर इतकी वाढली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या गाठेमुळे त्याची श्‍वासनलिका मूळ जागेपासून उजव्‍या बाजूला पूर्णपणे झुकली होती. मात्र त्याला श्‍वास घेण्यास त्रास होत नव्‍हता. ही गाठ मानेतील एक मुख्‍य रक्तवाहिनीपासून वाढत होती. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी सुघटन शल्‍य चिकित्‍साशास्‍त्र चिकित्‍सक (प्‍लॅस्टिक सर्जरी), उरोशल्‍य चिकित्‍साशास्‍त्र चिकित्‍सक (सीवीटीएस), व्‍हॅसक्‍युलर इंटरवेंशनल रेडिओलॉजीचे तज्ञ आणि भूलतज्ञ यांनी सखोल चर्चा केली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्‍णाच्‍या जीवास धोका असल्याची कल्पना रुग्‍ण व त्‍याच्‍या नातेवाईकांना देऊन त्‍यांची लेखी संमती घेण्‍यात आली.

हेही वाचा : कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, पाच रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

शीव रुग्णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुघटन शल्‍य चिकित्‍सक डॉ. मुकुंद जगन्‍नाथन, डॉ. अमरनाथ मुनोळी आणि त्‍यांचे सहकारी, सीवीटीएस तज्ज्ञ डॉ. जयंत खांडेकर, व्‍हॅसक्‍युलर इंटरवेंशनल रेडिओलॉजीचे डॉ. विवेक उकीर्डे आणि त्‍यांचे सहकारी, भूलतज्ञ डॉ. शकुंतला बसंतवानी यांनी ४ ऑक्टोबर २०२३ रोजी तब्बल साडेसहा तास शस्त्रक्रिया केली. यावेळी गळ्याभोवती असणाऱ्या महत्वाच्‍या रक्‍त वाहिन्‍या, चेतापेशी आणि मांसपेशी यांना धक्‍का न लावता कौशल्‍याने शस्त्रक्रिया करण्यात आली. ही गाठ जवळजवळ दीड किलो वजनाची होती. रुग्‍णाची प्रकृती सुधारली असून तो आता पूर्णपणे बरा होण्‍याच्‍या मार्गावर आहे.