मुंबई : मुंबईत एकूण १०२५ महाकाय जाहिरात फलक असून त्यापैकी सर्वाधिक फलक अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भागात आहेत. तर तब्बल १७९ फलक रेल्वेच्या हद्दीत असून या फलकांसाठी महानगरपालिकेकडून परवानगी घेतलेली नाही, असे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबईत तब्बल १७९ जाहिरात फलक हे बेकायदेशीर आहेत, असे घाटकोपर दुर्घटनेनंतर उघडकीस आले आहे.
मुंबईत विविध ठिकाणी, विविध प्राधिकरणांच्या हद्दीत जाहिरात फलक आहेत. तर काही जाहिरात फलक इमारतींच्या वर आहेत. मुंबईत कोणाच्याही मालकीची जागा असली तरी जाहिरात फलक उभारण्यासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागते. पालिकेच्या अधिनियमानुसार ही परवानगी बंधनकारक आहे. मुंबईत रेल्वे, बेस्ट, बीपीटी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी या प्राधिकरणांच्या हद्दीत असे जाहिरात फलक उभे आहेत. मात्र त्यापैकी रेल्वे वगळता सर्व प्राधिकरणांच्या हद्दीतील फलकांसाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली आहे. परंतु, रेल्वेच्या हद्दीतील तब्बल १७९ जाहिरात फलकांसाठी पालिकेची परवानगी घेतलेली नाही, असे पालिका प्रशासनानेच जाहीर केले आहे. रेल्वेच्या हद्दीतील फलकांना पालिकेच्या परवानगीची आवश्यकता नाही, त्यांना रेल्वेचा कायदा लागू होतो, अशी भूमिका रेल्वे प्रशासन घेत असते. त्यामुळे गेली अनेक वर्षे हा वाद सुरू आहे.
हेही वाचा : कुटुंबातील कमावते गेल्याने दुःखाचा डोंगर; भरत राठोड, मोहम्मद अक्रम यांचा मृत्यू
मुंबईतील एकूण जाहिरात फलकांपैकी सर्वाधिक फलक अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भागात असून त्यांची संख्या १३४ इतकी आहे. त्या खालोखाल ताडदेव, ग्रॅन्टरोड परिसरात १३१, वांद्रे, खार पश्चिममध्ये १२९ अंधेरी, जोगेश्वरी पूर्वमध्ये १२२ जाहिरात फलक आहेत. तर रेल्वेच्या हद्दीतील सर्वाधिक जाहिरात फलक हे वडाळा, शिवडी परिसराचा समावेश असलेल्या एफ उत्तरमध्ये आहेत.
रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलकांबाबत पालिका प्रशासनाने आतापर्यंत अनेक वेळा रेल्वेला नोटीस बजावली आहे. जाहिरात फलकांचे खांब रेल्वेच्या हद्दीत असले तरी त्याचा जाहिरातीचा वरचा अवजड लोखंडी भाग (प्रोजेक्शन) रस्त्यावर येतो. त्यामुळे हे फलक कोसळल्यास पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. महालक्ष्मी स्थानक परिसरातील असे जाहिरात फलक हटवावे, अशी मागणी पालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र रेल्वेने पालिका प्रशासनाला कधीही जुमानले नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : मुंबई: दोन दिवसांपूर्वी गावी जाण्यासाठी तिकिट काढले; मात्र काळाने झडप घातल्याने गावी न्यावा लागणार मृतदेह
रेल्वेच्या हद्दीत जाहिरात फलक लावताना त्याकरीता पालिकेची परनवानगीही घेतली जात नाही. तसेच त्यासाठीचे परवाना शुल्कही भरले जात नाही आणि त्याबाबतचे नियमही पाळले जात नाहीत. मुंबईत असे अनेक जाहिरात फलक रेल्वेच्या हद्दीत उभारण्यात आले असून त्याचा पुढचा जाहिरातीचा भाग (प्रोजेक्शन) थेट रस्त्यावर आलेला आहे. महालक्ष्मी स्थानक परिसरात सेनापती बापट मार्गाकडून रखांगी चौकापर्यंतच्या रस्त्यावर असे भलेमोठे जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. ते पदपथावर आणि रस्त्यावर आलेले आहेत. त्यामुळे हे जाहिरात फलक काढून टाकावे अशी मागणी दक्षिण विभाग कार्यालयाने गेल्यावर्षी पश्चिम रेल्वेकडे केली होती. मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. पालिका प्रशासनाने २०१९ पासून आतापर्यंत याबाबत अनेक वेळा पश्चिम रेल्वेला पत्रव्यवहार केला आहे. मुंबईत जाहिरात फलकाना परवानगी देताना पालिका केवळ ४० फूट बाय ४० फूट आकाराच्या जाहिरात फलकांनाच परवानगी देते. मात्र रेल्वेच्या हद्दीतील हे फलक १२० बाय १२० चौरस फूटाचे म्हणजेच तब्बल १४ हजार चौरस फूट आकाराचे आहेत, अशी माहिती पालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा : नवजात बालकांचे छत्र हरपले; सचिन यादव, दिलीप पासवान यांचा झाला मृत्यू
एकूण जाहिरात फलक ….१०२५
प्रकाशमान जाहिरात फलक …..५७३
प्रकाशमान नसलेले जाहिरात फलक ….३८२
एलईडी ….७०