मुंबई : चेंबूर येथील पूर्व द्रुतगती मार्गावर मेट्रोच्या कामानिमित्त उभारण्यात आलेल्या लोखंडी पत्र्याला स्पर्श होताच विजेचा शॉक लागून १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पूर्व द्रुतगती मार्गावरील चेंबूर परिसरात ‘मेट्रो २ ब’चे काम सुरू आहे. या कामानिमित्त प्रकल्पस्थळी लोखंडी पत्रे उभारुन रस्ता अडवण्यात आला आहे. येथील सिद्धार्थ कॉलनी परिसरात राहणारा प्रज्वल नखाते (१४) सोमवारी सायंकाळी या पत्र्याच्या जवळून जात होता. यावेळी अचानक त्याचा पत्र्याला स्पर्श झाला आणि त्याला विजेचा शॉक लागला. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा : वर्सोवा-विरार सागरी सेतू होऊ देणार नाही, मच्छिमार संघटनांचा एमएमआरडीएला इशारा
मेट्रोचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने या पत्र्यांवर लाईट लावले होते. यापैकी एक विजेची तार उघडी होती. या तारेमुळे प्रज्वलला विजेचा धक्का बसला. याबाबत नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, मेट्रोने प्रज्वलच्या कुटुंबियांना तत्काळ ५० लाख रुपये मदत करावी अन्यथा मेट्रो विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेविका आशा मराठे यांनी दिला आहे.