मुंबई : वडाळा परिसरात १६ वर्षांच्या मूक-बधीर अल्पवयीन मुलीवर २२ वर्षीय तरूणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पीडित मुलीच्या मावशीचा मुलगा असून त्याच्याविरोधात वडाळा टी टी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी, पाच प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेला वेग

१६ वर्षांची पीडित मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत वडाळा परिसरात राहत असून ती मूक-बधीर आहे. आरोपी त्याच परिसरात वास्तव्यास होता. १ मे ते ३० ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत तो पीडित मुलीच्या घरी वास्तव्यास होता. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अनेकदा बळजबरीने लैगिंक अत्याचार केला. दोन दिवसांपूर्वी मुलीच्या आईला हा प्रकार समजला. त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यांनी तात्काळ वडाळा टी टी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मावस भावाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी झारखंडला पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 16 year old deaf mute girl raped by a 22 year old boy at wadala area mumbai print news css