मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मुलुंडमधील १७ इमारतींमधील रहिवाशांना गेल्या तीन महिन्यांपासून टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यासाठी या रहिवाशांना पदरमोड करावी लागत आहे. यामुळे हे रहिवासी संतप्त झाले असून पालिकेने तत्काळ या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

मुलुंड पश्चिम परिसरातील योगी हिल कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये एकूण १७ इमारती आहेत. या १७ इमारतींमध्ये १७५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या इमारतींना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, या रहिवाशांवर टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दररोज सुमारे सहा ते सात टँकरमधून सोसायटीला पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र हे पाणी कमी पडत असल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या १८ हजार कोटींच्या अटल सेतूला तडे; नाना पटोलेंनी समोर आणली दुरवस्था

या समस्येबाबत येथील नागरिकांनी अनेक वेळा पालिकेला पत्रव्यवहार केला. त्याचबरोबर पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेण्यात आली. मात्र या समस्येवर आद्यपही तोडगा काढण्यात आलेल्या नाही. परिणामी, रहिवाशांना दररोज १२ ते १५ हजार रुपये केवळ पाण्यासाठी खर्च करावे लागत आहेत. या रहिवाशांनी राजकीय पक्षाच्या नेते मंडळींकडेही धाव घेतली आहे. मात्र केवळ आश्वासनांपलिकडे त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्यामुळे आता निर्वाणीचा इशारा देत रहिवाशांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.