मुंबई : प्राप्तीकर विभागाने पाठवलेल्या नोटीशीमुळे भायखळा येथे राहणाऱ्या महिलेला वडिलोपार्जीत जमीन विकल्याची माहिती मिळाली. बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात प्राप्तिकर विभागाला जमीन विक्रीचे कागदपत्र सापडले होते. या माहितीच्या आधारे आता महिलेने केलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार मेरी जीन ग्रेसिया (६९) या भायखळा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या सासूच्या संयुक्त मालकीची वांद्रे येथे दोन हजार चौ. फुटांची जागा होती. या जागेचे सासूसह त्यांच्या दोन बहिणी मायरा मिरांडा व लॉरा डिसोझा व एक भाऊही संयुक्त मालक होते. सासूच्या मृत्यूनंतर ती जमीन ग्रेसिय यांचे पती यांच्या नावावर झाली होती. त्यानंतर २०१७ मध्ये पतीच्या निधनानंतर मेरी ग्रेसिया त्या जमिनीच्या संयुक्त वारस होत्या.
तक्रारदार ग्रेसिया यांना जून २०२१ मध्ये प्राप्तीकर विभागाकडून नोटीस प्राप्त झाली होती. त्यात वांद्रे येथील दोन हजार चौरस फुटांची वांद्रे येथील जमीन २० कोटी ८० लाख रुपयांना विकली असून त्याचा प्राप्तीकर भरण्यात आला नसल्याचे नमुद करण्यात आले होते. अशीच नोटीस पतीची मावशी मायरा मिरांडा व लॉरा डिसोझा यांनाही आली होती.

हेही वाचा : धारावी प्रकल्पाच्या अटी ‘मविआ’च्या काळातील, अदाणी समूहाचा खुलासा

त्यावेळी ग्रिसिया यांनी प्राप्तीकर विभागाला उत्तर पाठवत आम्ही आमची जमीन विकली नसल्यामुळे त्यावर कोणताही प्राप्तीकर भरला नसल्याचे सांगितले. पण प्राप्तीकर विभागाने उत्तर ग्राह्य न धरता त्यांना डिमांड नोटीस पाठवली. तसेच जमीन व्यवहाराचा पुरावा म्हणून २०१४ मधील डीड ऑफ कन्व्हेयन्सची दुय्यम प्रत पाठवली. एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुंबईतील कार्यालयात प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यात या जमिनीच्या व्यवहारांचे कागदपत्र प्राप्तीकर विभागाला सापडले होते. प्राप्तीकर विभागाने पाठवलेली डीड ऑफ कन्व्हेयन्सची प्रत पाहून ग्रेसिया यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

हेही वाचा : “धारावीकरांच्या घरांमध्ये कुणीतरी सुक्ष्म आणि लघू उद्योग मंत्री आहेच, पण…”, उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला

२०१४ मध्ये पॉवर ऑफ अॅटर्नीची नोंदणी करण्याच्या नावाखाली तक्रारादार यांचे पती व पतीच्या दोन मावश्यांना रजिस्टार कार्यालयात नेऊन त्यांच्याकडून डीड ऑफ क्न्व्हेयन्स तयार करून पतीच्या मामाच्या मुलाने ती जमीन विकल्याचे तक्रारदार यांना समजले. अखेर याप्रकरणी ग्रेसिया यांच्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात मामाच्या मुलासह पाच जणांविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, कट रचणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 20 crores fraud revealed due to income tax department s notice fraud case against five persons mumbai print news css