मुंबई : यंदा दिवाळीचा बोनस न मिळाल्यामुळे बेस्ट उपक्रमातील चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र आता दिवाळीनंतर एक महिन्याने २७ हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी भेट जमा झाली आहे. त्यामुळे बेस्टचे कर्मचारी सुखावले आहेत.
हेही वाचा : मुंबई विद्यापीठातर्फे पुनर्मूल्यांकनासाठी दरवर्षी लाखोंचा खर्च
दिवाळीनंतरही बोनस मिळत नसल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. या मागणी बेस्ट कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलनही केले. कर्मचाऱ्यांचा रोष लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने बेस्टच्या खात्यात ८० कोटी रुपये जमा केले. तसेच येत्या काही दिवसांत बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची बोनस रक्कम मिळू शकली नाही. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन, पुढील काही दिवसांत बोनस देण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाकडून स्पष्ट करण्यात आले होते. या निर्णयानंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच गुरुवारी २७ हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात २७ ते २९ हजार रुपये बोनस जमा झाला, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.