मुंबई : गुडघा प्रत्यारोपण करण्यासाठी सरकारी रुग्णालयात चांगली व्यवस्था नसल्याने अनेक रुग्ण खासगी रुग्णालयाला प्राधान्य देतात. मात्र महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत या शस्त्रक्रियेचा समावेश झाल्यापासून सरकारी रुग्णालयातही गुडघा प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया होत आहेत. जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागातील डॉक्टरांनी नुकत्याच एका आठवड्यात गुडघा प्रत्यारोपणाच्या तीन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.
कोपरखैरणे येथे राहत असलेल्या बानो शेख (४८) या महिलेचा पाच वर्षांपासून डाव्या पायाचा गुडघा दुखत होता. तर साताऱ्याच्या प्यारुद्दीन पठाण (७२) यांच्या डाव्या गुडघ्यामध्ये चार वर्षांपासून दुखत होते. तिसरे रुग्ण पनवेल येथे राहणारे नागनाथ भगत (६७) यांच्या उजव्या पायाचा गुडघाही एक वर्षापासून दुखत होता. तिन्ही रुग्णांच्या गुडघ्यात काही अंतर चालल्यानंतर प्रचंड वेदना होत होत्या. थोडावेळ विश्रांती घेतल्यावर आराम वाटत असे. प्यारूद्दीन पठाण यांचा गुडघा १९९९ मध्ये फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र बाकीच्या दोन्ही रुग्णांचा असा काहीही इतिहास नव्हता.
हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांचा आत्मविश्वास ढासळला आहे, कारण…”; शिवसेनेच्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
मात्र मागील काही महिन्यांत या तिघांचा त्रास वाढू लागल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या विविध तपासण्या केल्यानंतर त्यांच्या गुडघ्याला कधीच मार लागला नसल्याचे किंवा कोणतीही जखम नसल्याचे डॉक्टरांना आढळले. अधिक तपासणी केला असता या तिन्ही रुग्णांचे गुडघे निकामी झाले असून, त्यांचे प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.
जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि युनिट प्रमुख डॉ. नादिर शाह यांनी तातडीने तिघांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एका आठवड्यामध्ये या तिघांवर यशस्वी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च येतो. मात्र जे. जे. रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. या तिन्ही रुग्णांचे गुडघे आता चांगले असून, ते व्यवस्थित चालू लागले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, त्यांना उपचाराचा पाठपुरावा करण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नादिर शाह यांनी दिली.