मुंबई : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरात मंगळवारी सकाळपासून उष्ण वारे जाणवत होते. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३४.१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षाही अधिक नोंदले गेले. यंदा पूर्वानुमानानुसार एप्रिल महिन्यात तापमान सरासरीहून अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने याआधीच व्यक्त केला आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेत सातत्याने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवेची द्रोणीय स्थिती तयार होत आहे. यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे. तापमानातील ही वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दोन दिवस पावसाचा अंदाज
● राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. अजूनही काही भागात पावसाचा अंदाज आहे. ● सातारा, कोल्हापूर, पुणे या भागात हलक्या सरी तर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.
अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी अकोला येथे (४३.७ अंश सेल्सिअस कमाल) झाली होती. त्याखालोखाल लोहगाव ४२.७, जळगाव ४१.८, पुणे ४०.८, मालेगाव ४१.८ आणि सोलापूर येथे ४२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
विदर्भाचे तापमान ४० अंशांपुढेच
विदर्भातील कमाल तापमान मंगळवारी ४० अंशांपुढे नोंदले गेले. अमरावती ४१.६, बुलढाणा ३९.६, चंद्रपूर ४२.६, गोंदिया ३९.२, नागपूर ४१.४, वाशिम ४१.२, वर्धा ४१.५ आणि यवतमाळ ४२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.