मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या नवीन बस समाविष्ट करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा डिसेंबर २०२५ पर्यंत बेस्ट बसची स्वमालकीची बस सेवा बंद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईकरांना स्वस्तात आणि वेगवान सेवेपासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टचा स्वमालकीचा बसगाड्यांचा ताफा कायम राखण्यासाठी मुंबईकरांना एकत्र करून ‘बेस्ट बचाव’ अभियान राबविण्यात येत आहे. आता मुंबईतील ३६ आमदारांनाही या अभियानात सहभागी करण्याचा मानस आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेस्ट उपक्रमात खासगी कंत्राटदारांच्या बसची संख्या वाढत असून, स्वमालकीच्या बसची संख्या कमी होत आहे. मुंबई महानगरपालिकेने नवीन बसगाड्या खरेदी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाला तातडीने निधी दिला नाही, तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्टची सार्वजनिक परिवहन सेवा डिसेंबर २०२५ नंतर बंद पडण्याची भिती व्यक्त होत आहे. खासगी कंत्राटदारांकडून अचानकपणे बसची सेवा बंद करण्याचे प्रकार याआधी घडले आहेत. त्यामुळे भविष्यात खासगी कंत्राटदारांना नफा मिळत नसल्याने, थेट बस सेवा रद्द करण्याचा निर्णय ते घेऊ शकतात. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होतील. भविष्यात मुंबईकरांसाठी बेस्टची सेवा निरंतर राहण्यासाठी, मुंबईकरांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. तसेच मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी द्यावा, यासाठी मुंबईतील सर्व आमदारांनी प्रयत्न करावे, असे निवेदन ‘बेस्ट बचाव’ अभियानांतर्गत ७ ते १० ऑगस्ट दरम्यान दिले जाणार आहे.

हेही वाचा : मुंबई: रुग्णालयाच्या शौचालयात मोबाइलद्वारे चित्रीकरण करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला अटक, महिला डॉक्टरच्या सतर्कतेमुळे आरोपीला पकडले

‘बेस्ट बचाव’ अभियान जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दोन हजार ५०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबर संपर्क साधण्यात येणार आहे. ‘बेस्ट बचाव’ हा विषय घेऊन कलात्मक देखाव्यांच्या माध्यमातून ‘बेस्ट’ वाचवण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे, असे मंडळांना सूचित केले जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 36 mla s to be participated in best bachao campaign mumbai print news css