मुंबई : शीव येथील पोलीस वसाहतीमधील राहत्या घरी ३८ वर्षीय पोलीस शिपायाने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसाने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली असून कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यात नमुद केले आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजय सर्जेराव साळुंखे (३८) असे मृत पोलिसाचे नाव असून ते शीव प्रतीक्षा नगर पोलीस वसाहतीतील ‘ए’ विंगमध्ये रहायचे. वडाळा टीटी पोलिसांना शुक्रवारी रात्री दूरध्वनी आला त्यात एका पोलिसाने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. त्यानुसार वडाळा टीटी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. साळुंखे यांच्या चौथ्या मजल्यावरील घरी पोलीस पथक दाखल झाले. त्यावेळी त्यांना घरातील भींतीच्या कडीला लायलॉनच्या दोरीने गळफास घेतला होता. त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली असून त्यात पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमुद केल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबई: गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात

साळुंखे शाहू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोटदुखीचा त्रास असल्यामुळे ते ३० मेपासून कामावर गैरहजर होते. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. याप्रकरणी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.