मुंबई : पनवेल जवळील कोन परिसरातील २४१७ घरांच्या सोडतीतील पात्र विजेत्यांची घरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. या सोडतीतील पात्र आणि घराची संपूर्ण रक्कम भरलेल्या ५८१ विजेत्यांना गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजी घरांचा ताबा देण्यात येणार आहे. वांद्रे येथील समाज मंदिर सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात चावी वाटप करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील पनवेल जवळील कोन येथील २४१७ घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली होती. सोडतीनंतर मुंबई मंडळाने विजेत्या गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती सुरू करत ८०० हून अधिक कामगारांकडून घरांची रक्कमही भरून घेतली. यापैकी ५०० हून अधिक विजेत्यांनी घराची संपूर्ण रक्कम भरली. मात्र या विजेत्यांना अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी करोनाकाळात अलगीकरणासाठी ही घरे ताब्यात घेतली होती. त्यामुळे विजेत्यांना घराचा ताबा देता आला नाही. ही घरे रायगड जिल्हाधिकाऱ्याकडून परत एमएमआरडीएने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीच्या वादामुळे विजेत्यांना ताबा देता आला नाही. दुरुस्तीचा वाद मिटवल्यानंतर दुरुस्ती पूर्ण झालेल्या घरांचा ताबा संबंधित विजेत्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण चावी वाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळत नसल्याने ताबा रखडला होता.
आता मात्र म्हाडाच्या मुंबई मंडळाने आणि गिरणी कामगार सनियंत्रण समितीने चावी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी वांद्रे येथील समाज मंदिर सभागृहात चावी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. मुख्यमंत्री व्यस्त असल्याने आता छोटेखानी कार्यक्रमात चावी वितरण करण्यात येणार आहे. अनेक वर्षांची घराची प्रतीक्षा संपणार असल्याने ही बाब विजेत्यांना दिलासा देणारी ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात ५८१ विजेत्यांना घराची चावी देण्यात येणार आहे. भविष्यात पात्र विजेत्यांनी घरांची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर त्यांना घराचा ताबा देण्यात येणार आहे.