मुंबई : पश्चिम द्रुतगतीमार्गावर दहिसर चेकनाक्याजवळ सिमेंट मिक्सरने सहा वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना शुक्रवारी घडली. सिमेंट मिक्सर चालकाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकी चालवणारी महिला व तिचा सहा वर्षांचा मुलगा खाली पडले. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. तक्रारदार सीमा गुप्ता (४२) या मिरा रोड येथील रहिवासी आहेत. त्या कांदिवली येथील साई रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा नकुल गुप्ता (६) व त्या दुचाकीवरून शुक्रवारी कांदिवलीला दुचाकीवरून जात होते.
हेही वाचा : गोष्ट मुंबईची – भाग १४७ : आरे परिसरातच का सापडतात पुरातत्त्वीय पुरावे?
त्यावेळी सिमेंट मिक्सर चालकाने अचानक डाव्या बाजूला वळन घेतल्यामुळे त्याने गुप्ता यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे गुप्ता व त्यांचा मुलगा नकुल दुचाकीवरून खाली कोसळले. त्यावेळी लोकांनी आरडाओरडा केला. पण चालकाने गाडी थांबवली नाही. त्यामुळे सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली सहा वर्षांचा मुलगा येऊन तो गंभीर जखमी झाला. त्यालाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गुप्ता यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालक हरेंद्र महतोविरोधात गुन्हा दाखल केला.