मुंबई : लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सहा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या ३७ टप्प्यांच्या बांधकामासाठी ६७ हजार कोटींच्या निविदा मंगळवारी खुल्या केल्या. त्यांत नवयुग, मेघा, एल अॅण्ड टी, जे कुमार, अॅपको या बड्या कंपन्यांसह अन्य कंपन्यांच्याही निविदा आहेत.
‘एमएसआरडीसी’ने पुणे वर्तुळाकार रस्ता, विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, जालना – नांदेड द्रुतगती महामार्ग, भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग, नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्ग आणि नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्ग असे सहा प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यांच्या बांधकामासाठी काही महिन्यांपूर्वी ‘एमएसआरडीसी’ने निविदा मागवल्या होत्या. पुणे वर्तुळाकार रस्त्यासाठी नऊ टप्प्यांत, बहुउद्देशीय मार्गिकेसाठी ११ टप्प्यांत, तर जालना – नांदेड द्रुतगती महामार्गासाठी सहा टप्प्यांत निविदा मागवल्या होत्या. त्याच वेळी समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाचा भाग असलेल्या भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्गासाठी एका टप्प्यात, गोंदिया – नागपूर द्रुतगती महामार्गासाठी चार टप्प्यांत आणि नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्गासाठी सहा टप्प्यांत निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानुसार पुणे वर्तुळाकार रस्ता, बहुउद्देशीय मार्गिका आणि नांदेड – जालना या तीन प्रकल्पांसाठी २६ टप्प्यांत ८२ तांत्रिक निविदा दाखल झाल्या होत्या. तर भंडारा – गडचिरोली, गोंदिया – नागपूर आणि नागपूर – चंद्रपूर महामार्ग अशा समृद्धी विस्तारीकरणाच्या तीन प्रकल्पांसाठी ११ टप्प्यांत ४६ निविदा दाखल करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा : इमारत उंचीवरील बंदी झुगारुन जुहूमध्ये गृहप्रकल्प! खरेदीदारांवर टांगती तलवार
तांत्रिक निविदा खुल्या केल्यानंतर मंगळवारी ‘एमएसआरडीसी’ने सहाही प्रकल्पांसाठीच्या निविदा खुल्या केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यानुसार बहुउद्देशीय मार्गिकेसाठी नवयुग इंजिनीयरिंगने एका, ओरियन्टल स्ट्रक्चरल इंजिनीयरिंगने दोन, एल अॅण्ड टीने दोन, इरकॉनने दोन, जे. कुमारने दोन, तर मेघा इंजिनीयरिंग आणि वेलस्पून कंपनीने एका टप्प्यासाठीच्या निविदेत बाजी मारली आहे. पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी मेघा इंजिनीयरिंगने तीन, नवयुगने तीन तर पीएनसी इन्फ्रा, रोड-वे सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा, तसेच जी.आर. इन्फ्राने प्रत्येकी एका टप्प्याच्या निविदेत बाजी मारली आहे. त्याचवेळी जालना – नांदेड द्रुतगती महामार्ग प्रकल्पासाठी अॅपको इन्फ्राने दोन, माँटेकार्लो ने दोन तर रोडवे सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा आणि पीएनसी कंपनीने प्रत्येकी एका टप्प्याच्या कामासाठीच्या निविदा मिळविल्या आहेत. तर समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणातील तीन महामार्गांसाठी जीआर इन्फ्रा, गवार कन्स्ट्रक्शन, बीएससीजीएल इन्फ्रास्ट्रक्चर आदी कंपन्यांनी बाजी मारली आहे. आता या ३७ टप्प्यांतील बांधकामांच्या निविदा अंतिम करून आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर संबंधित कंपन्यांना कंत्राटे दिली जातील. या वर्षातच या सहाही प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्याचे ‘एमएसआरडीसी’चे नियोजन आहे. हे सहाही प्रकल्प एकूण ६७ हजार कोटी रुपये खर्चाचे असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : राज्यातील २० हजार दलालांची नोंदणी स्थगित, प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांविरोधात महारेराची कारवाई
मेघा, नवयुगला प्रत्येकी चार कंत्राटे
निविदांमध्ये नवयुग, मेघा, एल. ॲण्ड टी., जे कुमार, ॲपकोसारख्या बड्या कंपन्यांनी बाजी मारली आहे. त्यापैकी मेघा इंजिनीअरिंग ही राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे देणगी देणारी दुसरी मोठी कंपनी आहे. या कंपनीने एकंदर चार निविदा दाखल केल्या आहेत, तर नवयुग इंजिनीअरिंगनेही तेवढ्याच निविदा भरल्या आहेत.
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका
१- नवयुग इंजिनीयरिंग
२- ओरियन्टल स्ट्रक्चरल इंजिनीयरिंग
३- ओरियन्टल स्ट्रक्चरल इंजिनीयरिंग
४- एल. ॲण्ड टी.
५- एल अँड टी
६- इरकॉन
७- इरकॉन
८- जे. कुमार
९- मेघा इंजिनीयरिंग
१० – जे. कुमार
११ – वेलस्पून
हेही वाचा : बँकेच्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून पोलिसांची सायबर फसवणूक
पुणे वर्तुळाकार रस्ता
१- मेघा इंजिनीयरिंग
२- नवयुग इंजिनीयरिंग
३- नवयुग इंजिनीयरिंग
४- नवयुग इंजिनीयरिंग
५- मेघा इंजिनीयरिंग
६- पीएनसी इन्फ्रा
७- मेघा इंजिनीयरिंग
८- रोडवे सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा
९- जीआर इन्फ्रा
जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग
१-अॅपको इन्फ्रा
२-अॅपको इन्फ्रा
३-माँटेकार्लो
४-पीएनसी
५-माँटेकार्लो
६-रोडवे सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा
हेही वाचा : पारपत्र निलंबनामुळे भारतात परतू शकत नाही, मेहूल चोक्सीचा विशेष न्यायालयात दावा
भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग
पटेल इन्फ्रा
गोंदिया-नागपूर द्रुतगती महामार्ग
१-अॅफकॉन इन्फ्रा
२-अॅफकॉन इन्फ्रा
३ एनसीसी
४-एनसीसी
नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग
१-जीआर इन्फ्रा
२-गवार कन्स्ट्रक्शन
३-गवार कन्स्ट्रक्शन
४-एचजी इन्फ्रा
५-एचजी इन्फ्रा
६-बीएससीजीएल इन्फ्रास्ट्रक्चर