मुंबईः शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७५ वर्षीय निवृत्त व्यक्तीची ११ कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार कुलाबा परिसरात घडला. आरोपींनी देशातील मोठ्या ब्रोकिंग कंपनीच्या नावाने बनावट मोबाईल ॲप्लिकेशन तयार करून तक्रारदाराची फसवणूक केली असून याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७५ वर्षीय तक्रारदार कुलाबा येथील रहिवासी असून शिप कॅप्टन म्हणून १९८५ मध्ये निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत काम केले. तेथून ते ऑपरेशन मॅनेजर म्हणून निवृत्त झाले होते. यावर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांना अनया स्मिथ नावाच्या महिलेने एका व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सामील करून घेतले होते. त्यांनी देशातील मोठ्या ब्रोकिंग कंपनीच्या नावाने हा ग्रुप तयार केला होता. या कंपनीमार्फत गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल, असे आमिष तक्रारदाराला दाखवण्यात आले. त्यावर विश्वास ठेऊन त्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आरोपी महिलेने तक्रारदाराला एक लिंक पाठवली. त्यावर क्लिक केले असता तक्रारदार मोतीलाल ओस्वाल ओटीसी नावाचे ॲप डाऊनलोड झाले. आरोपींनी त्यांचे डिमॅट खाते उघडल्याचे भासवले. त्यानंतर त्यांना चॅटद्वारे विविध शेअर्समध्ये गुंतणूक करण्याचे संदेश येत होते. त्यात गुंतवणूक करण्यासाठी तक्रारदाराला विविध बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. त्यांना संशय आला असता महिलेने कर स्वरूपात रक्कम भरायची असल्यामुळे विविध बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केली जात असल्याचे सांगितले.

हेही वाचा : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांचे आजपासून क्रमांक बदलले, फलाट क्रमांक ‘१०’ऐवजी ‘९ ए’ आणि फलाट क्रमांक ‘१० ए’ऐवजी ‘१०’

महिलेच्या सांगण्यावरून तक्रारदाराने २२ व्यवहारांद्वारे ११ कोटी १६ लाख ६१ हजार रुपये विविध खात्यात जमा केले. त्यावर चांगला नफा झाल्याचे तक्रारदाराला मोबाइल ॲपवर दिसत होते. त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना २० टक्के सेवा कराच्या स्वरूपात भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यावेळी संशय आल्यामुळे त्यांनी लोअर परळ येथील मोतीलाल ओस्वालच्या कार्यालयात जाऊन तपासणी केली असता संबंधित ॲप्लिकेशन बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तोपर्यंत तक्रारदाराने आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यात ११ कोटी १६ लाख रुपये जमा केले होते. अखेर याप्रकरणी त्यांनी सायबर पोलिसांच्या मदत क्रमांक १९३० वर दूरध्वनी करून घडलेल्या प्रकाराची तक्रार केली. त्यानुसार दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी रक्कम जमा झालेल्या बँक खात्याच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 75 year old man defrauded for rupees 11 crores with the lure of share market investment mumbai print news css