मुंबई : धारावी परिसरात आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली असून याप्रकरणी धारावी पोलीसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील आरोपी १५ वर्षांचा असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
धारावी येथे पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपी मुलाने तिला आपल्या घरी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. याबाबतची माहिती पीडित मुलीच्या भावाला समजली असता त्याने दूरध्वनी करून आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी आई तात्काळ घरी आली. तिने पीडित मुलीला विचारले असता सर्व प्रकार उघड झाला. अखेर पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी धारावी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी धारावी पोलीस अधिक तपास करीत आहेत. पीडित मुलीला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपाचारासाठी नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.