मुंबई : कर्करोगावरील संशोधनात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली जोगेश्वरी येथील महिलेची ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी महिला शहनिला सय्यद हिने गुंतवणूकीवर दरमहा चार ते पाच टक्के परतावा देण्याचे आमिष तक्रारदार महिलेला दाखवले. पण प्रत्यक्षात आरोपीला देण्यात आलेल्या रकमेपैकी ९ कोटी रुपये संशोधन कार्यात गुंतवलेच नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपी महिलेने अशा प्रकार अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. त्याबाबत अंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तक्रारदार शायरा खान यांच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२) (फौजदारी विश्वासघात, ३१८ (४) (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जोगेश्वरी येथील रहिवासी असलेली महिला शहनिला सय्यद हिच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपी सय्यद हिने आपण डॉक्टर असल्याचे तक्रारदार खान हिला सांगितले होते. सय्यदने कर्करोगाच्या उपचारासाठी नवी मुंबईतील प्रसिद्ध रुग्णायात वैद्यकीय संशोधन सुरू आहे. त्यात गुंतवणूक केल्यास अल्पवधीत रक्कम दुप्पट होईल, असे आमिष आरोपीने दाखवले होते. आरोपी महिलेने तक्रारदार खान यांना दर महिन्याला ४ ते ५ टक्के दराने गुंतवणूकीवर परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार महिलेने ३० ऑक्टोबर २०२३ ते ७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत १० कोटी २५ लाख रुपये गुंतवले. तीन विविध बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली. त्या बदल्यात तक्रारदार महिलेला एक कोटी १८ लाख रुपये नफा मिळाला. सर्व बँक व्यवहार व सुमारे सव्वा कोटी रुपये नफा मिळाल्यामुळे तक्रारदार महिलेचा सय्यदवर विश्वास बसला. खान यांच्यासह त्यांच्या परिचित व्यक्तींनीही सय्यदमार्फत गुंतवणूक केली. पण काही काळानंतर तक्रारदारांना नफा मिळणे बंद झाले. त्यामुळे विचारणा केली असता तक्रारदारांना विविध कारणे सांगून टाळण्यात आले. याबाबत चौकशी केली असता कर्करोगाच्या संशोधनासाठी तक्रारदार महिलेने दिलेली कोणतीही रक्कम गुंतवण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार महिला खान यांनी तपासणी केली. तक्रारदार महिलेची रक्कम कर्करोगाच्या संशोधनासाठी न गुंतवता नऊ कोटी सहा लाख ९९ हजार ८५५ एवढ्या रक्कमेचा वैयक्तिक वापर झाल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार महिलेने आरोपी महिलेकडे पैशांची मागणी केली असता त्यांना कोणतीही रक्कम मिळाली नाही. अखेर त्यांनी नुकतीच अंबोली पोलिसांकडे तक्रार केली. महिलेच्या तक्रारीवरून प्राथमिक चौकशी करून अंबोली पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक व फौजदारी विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader