मुंबई : विक्रोळी पार्कसाईट येथे राहणाऱ्या सात वर्षांच्या मुलाच्या डाव्या कानावर एका खासगी रुग्णालयात क्वाक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र रुग्णाच्या कानामध्ये यंत्र बसवण्यात अडचण येत असल्याने डॉक्टरने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढील शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्याची तयारीही डॉक्टरांनी दर्शविली. यासंदर्भात शिव आरोग्य सेनेने डॉक्टरांशी संपर्क साधल्यावर त्यांनी शस्त्रक्रियेसाठी जमा केलेले पैसेही परत केले. पुण्यामध्ये अनामत रक्कम भरली नाही म्हणून रुग्णाला दाखल करून घेण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिल्याची घटना ताजी असताना मुंबईमध्ये डॉक्टरने रुग्णाच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलून माणुसकीचे दर्शन घडवले.

विक्रोळीतील पार्कसाईट येथे राहणारे प्रवीण केंगार यांच्या सात वर्षांच्या मुलाच्या कानावर एका खासगी रुग्णालयामध्ये कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. क्रिस्तोफर डिसोझा यांनी क्वाक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली. यासाठी केंगार यांनी रुग्णालयामध्ये एक लाख रुपये जमा केले होते. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या डाव्या कानाच्या बाजूला यंत्र बसविण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात त्यांनी केंगार यांना सर्व माहिती देऊन तीन ते सहा महिन्यांनी पुन्हा तपासणीसाठी येण्यास सांगितले. योग्य परिस्थिती असल्यावर शस्त्रक्रिया करू, तसेच त्यावेळी शस्त्रक्रियेसाठी कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत, असे डॉ. क्रिस्तोफर डिसोझा यांनी त्यांना सांगितले.

दरम्यान, नोव्हेंबर २०२० मध्ये केंगार यांच्या मुलाच्या कानावर करण्यात आलेल्या क्वाक्लियर इम्प्लांटच्या वेळी आलेल्या काही अडचणीमुळे शस्त्रक्रिया अयशस्वी झाली होती. त्यावेळीही केंगार यांनी २.५ ते ३ लाख रुपये खर्च केले होते. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याच्या भावनेने केंगार यांनी शिवसेनेच्या (ठाकरे) शिव आरोग्य सेनेकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार राज्य सरचिटणीस जीतेंद्र सकपाळ व त्यांच्या सहकार्यांनी डॉ. क्रिस्तोफर डिसोझा यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये रुग्णावर पुन्हा करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेचा सर्व खर्चाची जबाबदारी उचलल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून केंगारे यांनी शस्त्रक्रियेसाठी भरलेला १ लाख रुपयांचा धनादेश त्यांना परत केला.

शिव आरोग्य सेनेने रुग्णाची तक्रार येताच डॉक्टरांशी केलेल्या सकारात्मक चर्चेमुळे केंगारे यांनी शस्त्रक्रियेसाठी जमा केलेले पैसे परत केले, अशी माहिती शिव आरोग्य सेनेचे मुंबई जिल्हा सह समन्वयक प्रकाश वाणी यांनी सांगितले.

क्वाकलियर इम्प्लांटसाठी साधारणपणे सहा ते सात लाख रुपये खर्च येतो. सर्वसामान्यांना हा खर्च परवडणारा नसल्याने सामाजिक संस्थाच्या माध्यमातून एक ते दोन लाखांमध्ये आम्ही या शस्त्रक्रिया करतो. केंगारे यांच्या मुलाची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आम्ही पुढील खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली होती. तसेच शिव आरोग्य सेनेच्या मागणीनुसार त्यांनी जमा केलेले पैसेही त्यांना परत करण्यात आले. – डॉ. क्रिस्तोफर डिसोजा, कान, नाक, घसा तज्ज्ञ