मुंबई : हार्बर मार्गावरून पनवेल ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकलचा एक डबा सीएसएमटी रेल्वे स्थानकापूर्वी रुळावरून घसरला. ही घटना सोमवारी सकाळी ११.३५ च्या सुमारास घडली. त्यामुळे लोकल सेवा खोळंबली आहे. तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी १०.०५ वाजता पनवेलवरून लोकल सीएसएमटीच्या दिशेने निघाली होती. ही लोकल सीएसएमटी येथे फलाट क्रमांक दोनवर येत असताना एका डब्याचे चाक रुळावरून घसरले.
हेही वाचा : उत्तर मध्य मुंबईत तिरंगी लढत? गायकवाड, निकम यांच्याविरोधात माजी पोलीस आयुक्त संजय पांडे रिंगणात
या घटनेमुळे अनेक प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्या. या मार्गावरील अनेक लोकल या घटनेमुळे रखडल्या आहेत. तसेच डाऊन मार्गावर परिणाम झाला आहे. त्यामुळे संपूर्ण हार्बर मार्ग प्रभावित झाला आहे. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल मस्जिद स्थानकापर्यंत आणल्या जात आहेत. तसेच अनेक लोकल वडाळ्यापर्यंतच आणून पुन्हा परतीचा प्रवास करतील. दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. या दुर्घटनेचा कोणताही परिणाम मुख्य मार्गावर झालेला नाही, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.