मुंबई : दुबईचे चलन बदलण्याच्या बहाण्याने सांताक्रुज परिसरात राहणाऱ्या एका इसमाला दोघांनी चार लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत मुलुंड पोलिसांनी तपास करून कल्याण येथून एका महिलेसह दोघांना अटक केली. याप्रकरणात अन्वर सिद्धीकी यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. तीन महिन्यांपूर्वी सिद्धीकी यांना एका अनोळखी इसमाने मोबाइलवर संपर्क साधला होता. आपल्याकडे दुबईमधील दिऱ्हाम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ते कमी किमतीत देण्याचे आमिष त्याने सिद्धीकी यांना दाखवले. आरोपींनी सिद्धीकी यांना चार लाख रुपये घेऊन मुलुंड परिसरात बोलावले. आरोपींनी खात्री पटवण्यासाठी तक्रारदारांना काही खऱ्या चलनी नोटा दिल्या. त्यानंतर हातचलाखी करून कोऱ्या कागदाचे बंडल त्यांना देऊन आरोपीने चार लाख रुपये घेऊन पोबारा केला.
हेही वाचा : तणावग्रस्त तरुणांच्या संख्येत वाढ, १८ ते ४५ वयोगटातील तरुण मानसिक आजाराने त्रस्त
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिद्धीकी यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपीचा सुगावा लागत नव्हता. अखेर आरोपींचा त्याच्या मोबाइल क्रमांकावरून माग काढत पोलिसांनी रविवारी कल्याण येथून त्यांना अटक केली. मिराज खान (३४) आणि मुमताज शेख (३५) अशी या आरोपींची नावे असून दोघेही मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. या आरोपींनी आशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.