मुंबई : हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला शस्त्रास्त्रांसह वरळी परिसरातून अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे सापडली असून त्याच्याविरोधात शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरळीमधील एका सराईत आरोपीकडे विनापरवाना पिस्तुल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-३ च्या पोलिसांना मिळाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी वरळीमधील जीजामाता नगर येथे सापळा रचला होता. संशयीत श्याम पांडुरंग तांबे ऊर्फ सॅव्हिओ रॉड्रीग्स (४२) तेथे संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांच्या दृष्टीस पडला. गुन्हे शाखेच्या पथकाने जीजामाता नगर येथील बस थांब्याजवळून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल, मॅगझीन व तीन जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर तात्काळ त्याला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा : धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!
आरोपीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांबे सराईत आरोपी असून त्याच्याविरोधात २०१२ मध्ये हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीने पिस्तुल, मॅगझीन, जिवंत काडतुसे कोणाकडून खरेदी केली ? तो त्याचा वापर कशासाठी करणार होता? याबाबत गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करीत आहे.