मुंबई : मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील ह्रदयविकार विभागात वर्षानुवर्षे ह्रदयविकारावर नाविन्यपूर्ण उपचार केले जातात. केईएमच्या शताब्दी वर्षानिमित्तानेही अनेक उपक्रम ह्रदयविकार विभागात राबविण्यात आले असून दोनच दिवसांपूर्वी बारामतीच्या ७१ वर्षांच्या रखमा आजीवर अत्यंत जटील ह्रदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यातील रुग्णालयात दहा वर्षांपूर्वी या आजींचा व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट करण्यात आला होता. त्यानंतरही ह्रदयविकाराचा त्रास होत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ओपनहार्ट शस्त्रक्रियेचा पर्याय देण्यात आला. मात्र यात मोठा धोका असल्यामुळे त्यांनी थेट मुंबईतील केईएम रुग्णालय गाठले. येथे हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. अजय महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली एक नवीन प्रक्रिया (ट्रान्स कॅथेटर मायट्रल व्हॉल्व्ह) करण्यात आली. आज रखमा आज्जीची प्रकृती उत्तम आहे. एक-दोन दिवसांत त्या आपल्या घरी जातील, असे डॉक्टरांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाने शतकोत्तर वाटचालीत अनेक बदल केले. अनेक सुधारणा केल्या. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करत रुग्णहित जपण्याचे काम केले. केईएमच्या हृदयविकार विभागातही आज अनेक बदल होत आहेत. नाविन्यपूर्ण संकल्पना स्वीकारल्या जात आहेत. रखमा आज्जीवर करण्यात आलेली ह्रदयप्रक्रिया या नाविन्यतेचा एक नवा अध्याय म्हणावा लागेल. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे पुण्याहून ७१ वर्षीय आजींना केईएमच्या हृदयविकार विभागात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयरोग असल्याचे स्पष्ट होते. १० वर्षांपूर्वी त्यांचा व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट करण्यात आला होता व प्रोस्थेटिक व्हॉल्व्ह बसवण्यात आला होता. व्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे रुग्णाला त्रास होत होता.यावर आजींना ओपन हार्ट सर्जरीचा पर्याय देण्यात आला होता. परंतु त्यांचे वय लक्षात घेता तसेच अन्य शारीरिक समस्या लक्षात घेतल्यास ओपन हार्ट सर्जरी करणे त्यांच्यासाठी धोक्याचे होते. त्यामुळे ट्रान्ससोफेजियल इकोकार्डियोग्राफी व भूल देणे धोकादायक होते. या सर्व परिस्थितीचा विचार करून डॉ अजय महाजन व त्यांच्या टीमने ट्रान्स कॅथेटर मायट्रल व्हॉल्व प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत मर्यादित भूल देऊन ह्रदय शस्त्रक्रियेशिवाय नवीन कृत्रिम व्हॉल्व्ह बसविण्यात येतो. यात पायामधून कॅथेटर टाकून मायट्रल व्हॉल्व्हमध्ये करत कृत्रिम व्हॉल्व्ह घालण्यात आल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेत ह्रदयविकार विभागाचे प्राध्यापक डॉ. चरण लांजेवर, डॉ. श्रेयस रावत, डॉ. गिरीश सबनीस तसेच भूलतज्ज्ञ डॉ. संगीता उंबरकर, डॉ. धीरज कुमार तसेच ह्रदयशस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. उदय जाधव यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे ही अत्यंत अवघड प्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉ. महाजन म्हणाले. आमच्या सर्वच धाडसी निर्णयांना अधिष्ठाता डॉ. संगिता रावत यांचे पूर्ण सहकार्य असते, असेही त्यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाच्या शताब्दी निमित्तानेही ह्रदयविकार विभागाने रोटा आणि आय. व्ही. यू. एस.च्या मदतीने अँजिओप्लास्टी कार्यशाळेचे आयोजन केले होते. हा एक गुंतागुंतीचा कोरोनरी हस्तक्षेप आहे. फारच थोड्या ह्रदयविकारावर उपचार करणाऱ्या संस्था व रुग्णालयात केला जातो. या प्रक्रियेचा वापर गंभीर कॅल्सिफाइड कोरोनरी जखमांवर उपचार करण्यासाठी केला जातो. यात ह्रदयाकडील रक्तवाहिन्या कॅल्शियममुळे हाडांसारख्या घट्ट होतात. ही एक आव्हानात्मक प्रक्रिया असून त्यासाठी असाधारण कौशल्याची आवश्यकता असते. रोटेशनल एथेरेक्टॉमी उपकरण कॅल्सिफाइड प्लेकच्या भौतिक गुणधर्मांमध्ये बदल करते यामुळे स्टेंट जखमेतून जाऊ शकतात. केईएमच्या हदयविकार विभागाचे प्रमुख प्राध्यपक डॉ. अजय महाजन व प्राध्यापक डॉ. चरण लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सायन रुग्णालयाच्या हरदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. पी. जे. नथानी तसेच सहाय्यतक प्राध्यापक डॉ. मिलिंद फडके, सहाय्यक प्राध्यापक, डॉ. श्रेयस रावत हे या कार्यक्रमाला विशेष आमंत्रित होते. तर प्राध्यापक डॉ. हेतन शाह, डॉ. गिरीश सबनीस, डॉ. धीरज कुमार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
केईएमच्या हृदयविकार विभागात केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून रुग्ण मोठ्या विश्वासाने उपचारासाठी येत असतात. २०२३-२४ या एकाच वर्षात येथील ह्रदयविकार विभागात तब्बल १७९२ अँजिओग्राफी करण्यात आल्या तर ९१० अँजिप्लास्टी केल्या गेल्याचे डॉ. महाजन म्हणाले. बाह्यरुग्ण विभागात तब्बल ५० हजार ७८३ रुग्णांना तपासण्यात आले तर साडेपाच हजारांहून अधिक रुग्णांवर दाखल करून वर्षभरात उपचार करण्यात आले. अलीकडेच या विभागात अत्याधुनिक आयएपीबी मशीन, नवीन टू डी इको लॅब, ईसीजी आणि होल्टर मशीन्स बसवण्यात आली आहेत. शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात हृदविकार विभागात ह्रदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांच्या देखरेखीसाठी ‘वॉर रुम’ सुरु करण्यात येणार असून रुग्णांच्या सोयीसाठी डे-केअर प्रक्रिया म्हणून ट्रान्स-रॅडियल कोरोनरी कॅथेटेरायझेशनची कामगिरी सक्षम करण्यासाठी रेडियल लाउंज तयार करणे तसेच कार्डिओलॉजी आणि कार्डियोथॉरॅसिक सर्जन विभागाच्या रहिवाशांसाठी शिक्षण केंद्र म्हणून अत्याधुनिक कार्डिओव्हॅस्क्युलर कॉन्फरन्स हॉल तयार करण्याची योजना असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले.