मुंबई : बाजारातून घरी जाणाऱ्या महिलेची छेड काढून तिच्यावर एका तरूणाने चाकूहल्ला केल्याची घटना गुरुवारी गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात घडली. याबाबत देवनार पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. गोवंडीमधील गौतम नगर परिसरात पीडित २६ वर्षीय महिला कुटुंबियांसोबत राहते. ती गुरुवारी रात्री परिसरातील बाजारात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. रात्री उशिरा घरी परतत असताना आरोपी बाबू बंगालीने (२५) तिची छेड काढली.
हेही वाचा : फॅशन स्ट्रीट कात टाकणार; मुंबई महानगरपालिकेने केली सल्लागाराची नियुक्ती
महिलेने त्याला विरोध करताच आरोपीने त्याच्याजवळील चाकूने महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील काही नागरिकांनी तत्काळ जखमी महिलेला एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच देवनार पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि महिलेकडे विचारपूस केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाबू बंगालीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.