मुंबई : मुंबईतील विविध प्रश्नांसंबंधी चर्चा करण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी पाणी, रस्ते, सागरी किनारा मार्ग अशा विविध विषयांवर चर्चा केली. तसेच राज्य सरकारकडे थकीत असलेली साडेसोळा हजार कोटी रुपयांची थकीत रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
मुंबईत विविध ठिकाणी कधी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. तर कधी दूषित पाणीपुरवठा, पाणी कपात अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांबाबत महापालिकेने नागरिकांना समक्ष उत्तर द्यावे व या समस्यांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. काही दिवसांपूर्वी दिंडोशी येथे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली गोरेगावमध्ये हंडा मोर्चा काढण्यात आला होता. तसेच गेल्या काही महिन्यांपासून वरळीतही रहिवाशांना पाणी टंचाई भेडसावत होती. त्यामुळे पाण्याच्या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
हेही वाचा : जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांचे विद्यावेतन रखडले, निवासी डॉक्टर मानसिक तणावाखाली
सागरी किनारा मार्ग सुरू होण्यास विलंब होत असल्याबद्दलही ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील सागरी किनारा प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण झाले असते. मात्र, शिंदे सरकारच्या दिरंगाईमुळे अजूनही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही, असा आरोप ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून केला. सागरी किनारा मार्गाचा उर्वरित भाग त्वरित सुरू करावा, अशीही विनंती ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना भेटीदरम्यान केली. रस्त्यांच्या कंत्राटातील घोटाळ्याविषयी निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी ठाकरे यांनी पुन्हा केली. तसेच राज्य सरकारकडे थकित असलेली साडेसोळा हजार कोटींची रक्कम मिळवण्यासाठी महापालिकेने सरकारकडे पाठपुरावा करावा. जेणेकरून बेस्ट आणि इतर नागरी सुविधांसाठी हा निधी उपलब्ध होईल, असेही ठाकरे यांनी यावेळी आयुक्तांना सांगितले.