मुंबई : आम आदमी पक्षाचे प्रमुख (आप) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातला संताप आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमटत आहे. दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या शक्तिप्रदर्शनामध्ये ‘आप’चे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सामील झाले होते. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा व ‘जेल का जवाब वोट से’ असा मजकूर लिहिलेले फलक हाती घेत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रखरखत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात असल्यामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण आहे, परंतु ‘आप’च्या कार्यकर्त्यांची गळ्यात पक्षाचा शेला, डोक्यावर टोपी व हाती झेंडे घेत भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु होती. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले ‘जेल का जवाब वोट से’ अशा आशयाच्या फलकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. जेल का जवाब वोट से, अरविंद केजरीवाल जिंदाबाद, भारत माता की जय, पहले लढे थे गोरो से – अब लडेंगे चोरोसे, गली गली में शोर है भाजपा सरकार चोर है आदी घोषणा करीत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील फोर्ट परिसर दणाणून सोडला.
हेही वाचा…गृहप्रकल्पातील सर्व सुविधांचाही तपशील देणे विकासकांसाठी बंधनकारक, महारेराकडून आदेशाचा मसुदा प्रसिद्ध
‘आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून ऐन निवडणुकीच्या काळात तुरुंगात टाकले आहे. या हुकूमशाही वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला जो धक्का दिला आहे, त्याचे उत्तर आम्ही मतदानातून देणार आहोत. त्यामुळे ‘जेल का जवाब वोट से’ ही आमची नवीन घोषणा आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही जागोजागी ही घोषणा व प्रचार करीत आहोत. सध्या मोदी सरकारबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे, त्यामुळे बहुसंख्य मतदार हे महाविकास आघाडी – इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करतील’, असे आम आदमी पक्षाचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष धनराज वंजारी यांनी ‘लोकसत्ताशी’ बोलताना सांगितले.