मुंबई : ‘शहरापासून दूर जाऊन शेतात राहायला लागल्यानंतर खूप काही सुचते. पण गाणे आणि कविता म्हणून नाही, तर जे डोळ्यांसमोर दिसते ते कागदावर उमटते. मनातले कागदावर उतरवत असताना तुमची घुसमट कागदावर उमटते. शहराच्या भिंतींमध्ये सातत्याने राहायला जमत नाही. शेतात भिंतींच्या जागी डोंगर आला, हे फार बरे झाले. शेतावर गेल्यानंतर मनाचा बकालपणा दूर होतो’, असे विचार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सागरिका म्युझिक कंपनीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात व्यक्त केले. तसेच, माझ्या आधीच्या आणि आताच्या भूमिकेमध्ये काही साधर्म्य असेल तर मी नट म्हणून कमी पडतो, असेही नाना पाटेकर म्हणाले.
‘सागरिका म्युझिक’ या कंपनीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वरळीत गुरुवार, ४ जुलै रोजी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला संगीत आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी ‘नानाछंद’ या नव्याकोऱ्या संगीत अल्बमचे अनावरण ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर, गायक सुदेश भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘नानाछंद’ या सांगीतिक अल्बमच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर यांची कवी आणि गीतकार म्हणून बाजू सर्वांसमोर आली आहे. या सांगीतिक अल्बममधील गंध तुझ्या पावलांचा, हिरवा हळवा आणि दहिवर या तिन्ही गीतांचे लेखन नाना पाटेकर यांनी केले आहे. तर संगीतकार निलेश मोहरीर यांनी ही गीते संगीतबद्ध केली असून गायिका वैशाली सामंत, गायक राहुल देशपांडे व स्वप्नील बांदोडकर यांनी गायली आहेत. या विशेष सोहळ्याचे सूत्रसंचालन दिप्ती भागवत यांनी केले.
हेही वाचा : अदानीपासून मुंबईला वाचवा! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
‘सागरिका म्युझिकला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, हा माझ्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे. मी भाग्यवान समजते की मला संगीतक्षेत्रातील दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले’, अशी भावना सागरिका म्युझिक कंपनीच्या सर्वेसर्वा सागरिका दास यांनी व्यक्त केली. तर ‘काही जणांच्या कुंडलीत राजयोग असतो, सागरिका यांच्या कुंडलीत ‘राग योग’ आहे. गेली २५ वर्षे सागरिका म्युझिकने संगीत क्षेत्राला महत्वपूर्ण योगदान दिले आहे’, असे मत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले.