मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील हवेचा दर्जा खालावल्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काही दिवसांपासून मुंबईतील बहुतांश ठिकाणी हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली जात आहे. मात्र, गोवंडीतील शिवाजी नगरमधील वायू प्रदूषणात घट होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढ होत आहे.
समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारी शिवाजी नगर येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तेथील हवा निर्देशांक २३५ इतका होतो. सलग तीन दिवस शिवाजी नगर येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. अशा परिस्थितीत येथे कसे राहायचे असा प्रश्न स्थानिक उपस्थित करू लागले आहेत. शिवाजी नगरमध्ये शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारासही हवेची गुणवत्ता ‘वाईट’च होती. येथे पीएम २.५ धूलीकणांचे प्रमाण अधिक होते. दरम्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. तसेच या परिसरातील बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना न केल्याने हवेत धूळ पसरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर राडारोड्याच्या अवैध वाहतुकीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरते. तसेच कचराभूमीमधील कचरा जाळण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे सतत प्रदूषण वाढत आहे. यापूर्वीही अनेक वेळा शिवाजी नगरमधील हवेची ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंद झाली होती.
हेही वाचा : मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६८ मीटर उंच शिडी वाहने दाखल होणार
दरम्यान, शिवाजी नगरमधील हवा सातत्याने बिघडत असल्याने पालिका बांधकामांवर निर्बंध घालण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता. मात्र, आतापर्यंत शिवाजी नगरमधील हवा गुणवत्तेत कोणतीही सुधारणा झालेली नाही.
मागील काही दिवसांतील हवा निर्देशांक
३ जानेवारी- २१२
५ जानेवारी- २१८
६ जानेवारी-२३५
८ जानेवारी- २७२
९ जानेवारी- २६८