मुंबई : मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदला गेला. ‘समीर’ ॲपनुसार शनिवारी मुंबईच्या हवेचा निर्देशांक ७१ वर पोहोचला होता. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कडक कारवाईमुळे मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार, नेव्ही नगर येथे शनिवारी हवा निर्देशांक ७६ इतका होता. त्याचबरोबर पवई येथे ७०, शीवमध्ये ८४, विलेपार्ले येथे ८४, भांडूप आणि वरळीमध्ये हवा निर्देशांक ७४ होता. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून मुंबईचा हवा निर्देशांक ७८-१०० दरम्यान आहे. शुक्रवारी मुंबईची हवा काहीशी खालावली होती. यामुळे समाजमाध्यमांवर चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर शनिवारी त्यामध्ये सुधारणा झाली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक ०-५० दरम्यान ‘चांगला’, ५१ – १०० दरम्यान ‘समाधानकारक’, १०१ – २०० दरम्यान ‘मध्यम’, २०१ – ३०० दरम्यान ‘वाईट’, ३०१ – ४०० दरम्यान ‘अत्यंत वाईट’ आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे हवेची गुणवत्ता ‘अतिधोकादायक’ समजली जाते.

दरम्यान, नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत मुंबईतील हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. काही भागात बांधकामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. महानगरपालिका प्रशासनाने हवेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. तसेच विविध मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत.

देवनार ‘मध्यम’ श्रेणीतच

देवनार येथे याआधी वाईट श्रेणीत हवा नोंदली जात होती. अनेकदा येथील हवा ‘वाईट’ श्रेणीतच राहायची. या पार्श्वभूमीवर परिसरात कारवाई केल्यानंतर येथील हवा निर्देशांकांत फरक पडू लागला. शनिवारी येथील हवा निर्देशांक ११३ इतका होता.

बोरिवली, भायखळ्याची हवा ‘समाधानकारक’

काही दिवसांपूर्वी बोरिवली आणि भायखळामध्ये सातत्याने ‘वाईट’ श्रेणीत हवा नोंदली जात होती. या पार्श्वभूमीवर बोरिवली पूर्व आणि भायखळामधील बांधकामांवर पालिकेने बंदी घातली होती. त्यानंतर तेथील हवेच्या दर्जात सुधारणा झाली. येथील हवा शनिवारीही ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली होती. भायखळा येथील हवा निर्देशांक ६३, तर बोरिवली येथील ७४ होता.

हवा बिघडल्यास नागरिकांनी काय करावे ?

दीर्घकाळ प्रदूषित हवेत काम करू नका.
अतिशारीरिक श्रमाची कामे टाळा.
सर्दी, खोकला असलेल्यांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका.
श्वसनाचे विकार असलेल्यांनी प्रदूषित हवेत जाऊ नये.