मुंबई : मुंबईतील हवेचा निर्देशांक मंगळवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला गेला. वांद्रे – कुर्ला संकुल येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता सोमवारी मध्यम श्रेणीत होती. समीर ॲपनुसार मंगळवारी सकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक १३७ वर पोहोचला होता. दरम्यान, मुंबईत धुके पडत असल्यामुळे वातावरणात प्रदूषके साचून राहण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवसांत मुंबईमध्ये धुके जाणवेल आणि याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे १००टक्के आरक्षण
मुंबईत सध्या धुके, तसेच आर्द्रता असल्याने सकाळी प्रदूषके साचून राहतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार, मंगळवारी सकाळी वांद्रे – कुर्ला संकुल येथील हवा निर्देशांक २११ होता. तसेच तो माझगावमध्ये १३७, शीव येथे १२०, वरळीक ११५, बोरिवली येथे ११९ होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी हवा मध्यम श्रेणीत नोंदली गेली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० मधील समाधानकारक, १०१-२०० दरम्यान मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० दरम्यान अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते.