मुंबई : जशी मधाची धार कधी तुटत नाही त्याप्रमाणे लतादीदींचा स्वरही कधी तुटला नाही की त्याची गोडी कमी झाली नाही. एकदा मी माझ्या वडिलांना विचारलं होतं तुम्ही लतादीदींचे वर्णन कसे कराल, यावर त्यांनी ‘मधाची धार’ असे दीदींचे वर्णन केले होते, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ स्वीकारताना बुधवारी व्यक्त केल्या.
‘आकाशाची सावल’ ही स्वरचित मराठी कविता सादर करून त्यांनी दिदींना आदरांजलीही वाहिली. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. संगीत, नाटक, कला, वैद्याकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करणारा ३४ वा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आणि तिसरा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ बुधवारी पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात झालेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
हेही वाचा : शिवाजी पार्कमधील माती काढण्यात अडचणींचा डोंगर
यावेळी लता मंगेशकर यांची आठवण सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले, हल्लीच्या काळात वेगवेगळ्या कार्यक्रमांतून गीत, नृत्य अभिनय सादर केले जातात. असे कार्यक्रम मीही करतो. त्यासाठी लतादीदी कारणीभूत ठरल्या. मी न्यूयॉर्कमध्ये असताना १९८१ साली लतादीदींनी मला बोलावून घेतले. त्यांचा देखील न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम होणार होता. तेव्हा त्यांनी त्या कार्यक्रमात मी ‘लावारिस’ चित्रपटातील ‘मेरे अंगने में’ हे गाणे सादर करावे, अशी त्यांची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनुसार मी या कार्यक्रमात गाणे सादर केले. दीदींमुळे मी चित्रपटांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमही करू लागलो.
या सोहळ्यात प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांना संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य – चित्रपट – मालिका क्षेत्रातील योगदानासाठी, अभिनेते अतुल परचुरे यांना नाट्य क्षेत्रातील कार्यासाठी, अभिनेत्री पद्मिानी कोल्हापुरे यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी तर गायक रूपकुमार राठोड यांना हिंदुस्थानी संगीतातील योगदानासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट चित्रपटनिर्मितीसाठी विशेष वैयक्तिक पुरस्कार रणदीप हुडा यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यानंतर श्रीशारदा विश्वमोहिनी लतादीदी हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.
हेही वाचा : परीक्षेस हजर राहूनही गैरहजरचा शिक्का
माझ्यासाठी मोठा सन्मान
या सोहळ्यात व्यासपीठावर अनेक थोर कलावंत बसलेले आहेत त्यांच्यासह येथे बसणे हाच माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आजचा पुरस्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण मी एक कलाकार आहे आणि मला आज एका असामान्य गायक कलाकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आणि एका असामान्य नटाच्या उपस्थितीत पुरस्कार मिळतो आहे. कलाकार त्याच्या परीने कला सादर करत असतो, पण ती कला प्रेक्षकांना आवडली नाही तर त्या कलाकाराच्या कलेचा काही फायदा नसतो. त्यामुळे मी प्रेक्षकांचा कायमच ऋणी आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.
अजून मराठी शिकतो आहे…
एका पुरस्कार सोहळ्यात मी मनोगत व्यक्त करायला सुरुवात केल्यानंतर मला प्रेक्षकांनी मराठीत बोला अशी मागणी केली. त्यावर मी त्यांना मी शिकतोय असे सांगितले आणि मी वाचलो. हा दहा वर्षांपूर्वीचा अनुभव आहे. मात्र, अजूनही मला मराठी शिकता आले नाही. तारुण्यात कामामुळे शिकण्यासाठी वेळ नाही मिळाला. पण आता वृद्धापकाळात मला बराच वेळ मिळतो. त्यामुळे मराठी भाषा शिकण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे अमिताभ बच्चन यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : मैदान निसटू न देण्यासाठी मोदींच्या सभांवर सभा!
● सर्वोत्कृष्ट नाटक – गालिब
● दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल – (समाजसेवा)
● वाग्विलासिनी पुरस्कार – मंजिरी फडके (प्रदीर्घ साहित्य सेवा)
● मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – भाऊ तोरसेकर (प्रदीर्घ पत्रकारिता)