मुंबई: अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना (शिंदे), रिपाई महायुतीचे उमेदवार अमित साटम यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार साटम यांनी जुहू कोळीवाडा जंक्शन – एसएनडीटी कॅम्पस दरम्यान रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले.

हेही वाचा : रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकर यांचे निधन

सकाळी १० वाजता जुहू कोळीवाडा जंक्शनपासून अमित साटम यांच्या रॅलीला सुरुवात झाली. जुहू तारा रोड ते सांताक्रुज येथील एसएनडीटी कॅम्पसपर्यंत रॅली काढण्यात आली. ‘अंधेरी बोले दिल से, अमित साटम फिरसे’ अशा घोषणा रॅलीत देण्यात येत होत्या. रॅलीमध्ये भाजप, शिवसेना, रिपाई, महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अमित साटम यांनी एसएनडीटी कॅम्पस येथील निवडणूक कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, शिवसेना विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर, शिवसेना संघटक पराग कदम, भाजपचे माजी नगरसेवक अनिश मकवानी, रोहन राठोड, सुधा सिंग, रेणू हंसराज आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बंदेरी उपस्थित होते.