मुंबई : गर्द हिरवी झाडी, पक्षांचा किलबिलाट आणि निसर्गाचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी मुंबई महानगरपालिकेच्या निसर्ग उन्नत मार्गामुळे मुंबईकर, तसेच देश-विदेशातील पर्यटकांना मिळणार आहे.. फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान या ठिकाणी महापालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ४८५ मीटर लांब आणि २.४ मीटर रुंद लाकडी मार्गावरून चालताना निसर्गाच्या किमयेचा भन्नाट अनुभव पर्यटकांना मिळणार आहे. विविध प्रजातींच्या शेकडो वनस्पती, झाडे, निरनिराळे पक्षी, सरपटणारे प्राणी न्याहाळताना एका पॉईंटवरून गिरगांव चौपटीेचेही विहंगम दृश्य पाहता येणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने सुमारे ३० कोटी रुपये खर्चून सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला निसर्ग उन्नत मार्ग विकसित केला आहे. सुमारे अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी हा मार्ग पर्यटकांसाठी खुला झाला. संपूर्ण मार्गावर लाकडी फलाट, लाकडी कठडा (रेलिंग), दुतर्फा आधार देणारे खांब आणि लाकडी जोडणी सांधे अशा पद्धतीची रचना या मार्गावर करण्यात आली आहे. भक्कम पायाभरणीसह (पाईल फाऊंडेशन) पोलादी जोडणीचा आधारही या बांधकामाला देण्यात आला आहे. त्याचबरोबर आकर्षक स्वरूपाची प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री अंधारात या मार्गाचे सौंदर्य आणखी उजळून निघते. अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी एका वेळी केवळ २०० पर्यटकांना या मार्गावर प्रवेश देण्यात येणार असून दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे. तसेच, शैक्षणिक सहलींना तूर्तास परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
या मार्गाचे लोकार्पण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी पार पडले. या मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामांसह वास्तुशी संबंधित अन्य कामे पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. या ठिकाणी मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. तसेच, पर्यटकांना पूर्वपरवानगीशिवाय चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा प्रकल्प महापालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत विकसित करण्यात आला असून निसर्ग उन्नत मार्गाची लांबी एकूण ४८५ मीटर आणि रूंदी २.४ मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ’सी व्हिविंग डेक’ देखील बांधण्यात आला आहे. प्रकल्प कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी जागोजागी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
निसर्ग उन्नत मार्ग मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ ठरेल. हा प्रकल्प पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगानेही जनजागृतीसाठी आदर्श ठरेल. अधिकाधिक मुंबईकरांनी या निसर्ग उन्नत मार्गाला भेट द्यावी आणि निसर्गाचा आनंद घ्यावा, असे मंगल प्रभात लोढा यांनी लोकार्पण सोहळ्यादरम्यान केले. तसेच, निसर्ग उन्नत मार्गावर येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने सोयी-सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी. सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणांना दिले.
??मलबार हिल परिसरातील कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात उभारण्यात आलेला 'निसर्ग उन्नत मार्ग' आजपासून मुंबईकरांसाठी सशुल्क खुला करण्यात आला आहे. या निसर्गरम्य उन्नत मार्गाच्या लोकार्पण प्रसंगाची ही चित्रफीत…! ?️#MyBMCUpdates… pic.twitter.com/wwhl1XEFWO
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 30, 2025
निरनिराळे पक्षी न्याहळण्याची संधी
निसर्ग उन्नत मार्गावरून गुलमोहर, बदाम, जांभूळ, कांचन, ताड, फणस, रतन गुंज, सीता अशोक, अर्जुन, मुचकुंद, सप्तपर्णी, करमळ, विलायती शिरीष आदी प्रजातींचा झाडे पाहता येतील. तसेच, पक्ष्यांमध्ये कोकीळ, ताडपाकोळी, घार, भारतीय राखी धनेश, खंड्या, तांबट, टोपीवाला पारवा / पोपट, हळद्या, नाचण/नाचरा/नर्तक, कावळा, शिंपी चिमणी, बुलबुल, लालबुड्या बुलबुल, साळुंकी, दयाळ, चिमुकला फुलटोचा, जांभळ्या पाठचा सूर्यपक्षी, शुभ्रकंठी, ठिपकेवाली मनोली आदी पक्षी पाहण्याची संधी मिळणार आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सरडा, झाडसरडे, भारतीय सुळेदार सरडा, नाग, अजगर, नानेटी आदींचा समावेश आहे.
ऑनलाईन तिकिट नोंदणीची सुविधा
निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये, तर परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचे खंड (स्लॉट) तयार करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत विशेष मार्गाचीही व्यवस्था उभारण्यात आली आहे.