मुंबई : मुंबईतील सर्व १३ लाख ७९ हजार ८६ झोपडीवासीयांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने निविदा काढून महापालिकेच्या प्रभागनिहाय सर्वेक्षण संस्थांची नियुक्ती करण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत ४० टक्के बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित ६० टक्के पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी अधिक संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.

झोपडीधारकांची पात्रता निश्चितीची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी प्राधिकरणाने झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये महाॲानलाईनकडे हे काम सोपविण्यात आले. मात्र २०२१ पर्यंत फक्त दोन लाख २८ हजार २३५ झोपड्यांचे ड्रोन तर चार लाख ५६ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण होऊ शकले. २०२१ मध्ये टंडन अर्बन सोल्युशन, पायोनियर फौंडेशन आणि एसारआयटी या तीन संस्थांची नियुक्ती झाल्यानंतर प्रत्यक्षात क्रमांकन आणि बायोमेट्रीक सर्वेक्षणाला सुरुवात झाली. यापैकी आता टंडन अर्बन सोल्युशन यांना असमाधानकारक कामाबद्दल काढून टाकण्यात आले आहे.

किती झोपड्यांचे सर्वेक्षण?

मुंबईत एकूण २५९७ झोपडपट्ट्या असून त्यात १३ लाख ७९ हजार ८६ झोपडीधारकांचे वास्तव्य आहे. यापैकी २० मार्च २०२५ पर्यंत पाच लाख ६२ हजार ७११ झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित आठ लाख १६ हजार ३७५ झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण शिल्लक आहे. २०२१ नंतरच प्रत्यक्षात बायोमेट्रीक सर्वेक्षणाला सुरुवात झाली असली तरी गेल्या नऊ महिन्यांत सर्वेक्षणाने जोर धरला होता. परंतु सर्वेक्षणाचा वेग पाहता आणखी संस्थांनी नियुक्ती करण्याच्या सूचना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत. प्रभागनिहाय तसेच ज्या ठिकाणी अधिक झोपडपट्ट्या आहे तेथे विभागून संस्थांची नियुक्ती करणे तसेच सर्वेक्षणाची आकडेवारी फलकाद्वारे प्रदर्शित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

या झोपडीधारकांच्या सर्वेक्षणाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न होता. त्यासाठी बायोमेट्रीक सर्वेक्षणाला वेग यावा यासाठी प्राधिकरणाने मनुष्यबळही वाढविले होते. परंतु नियोजित वेळेत बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण होत नसल्याचे लक्षात आल्याने आता निविदा काढून आणखी काही संस्थांची या कामासाठी नियुक्ती करण्याचे ठरविले आहे. काही ठिकाणी सर्वेक्षणाला विरोध होत असला तरी संबंधित झोपडीधारकाला बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे महत्त्व समजावून सांगावे, अशा सूचनाही डॉ. कल्याणकर यांनी केल्या आहेत.

सर्वेक्षण का महत्त्वाचे?

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी झोपडीधारकांची पात्रता निश्चिती आवश्यक असून त्यानुसार झोपड्यांचे ड्रोन सर्वेक्षण तसेच झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येते. झोपडीधारकांनी जमा केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्रता निश्चिती करून परिशिष्ट दोन (पात्रता यादी) प्रसिद्ध केली जाते. सर्व झोपड्यांची पात्रता निश्चित झाल्यास विकासक नियुक्ती करणे सोपे जाते. आता तर स्वयंचलित पात्रता प्रक्रिया प्राधिकरणाने राबविली आहे. डॉ. कल्याणकर यांनी ही प्रक्रिया प्रत्यक्षात कार्यान्वित केली आहे. या प्रक्रियेशिवाय जारी होणारी पात्रता यादी अवैध ठरणार आहे. ही प्रक्रिया न करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्राधिकरणाचे आवाहन…

बायोमेट्रीक सर्वेक्षण खासगी विकासकामार्फत नव्हे तर झोपु प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण पात्रता निश्चितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असून त्यामुळे या सर्वेक्षणाला झोपडीधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

Story img Loader