मुंबई : पुणे – नाशिक अंतर पाच तासांऐवजी केवळ दोन तासांत पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाच्या संरेखनास अखेर अंतिम रुप देण्यात आले असून राज्य सरकारने यास मान्यता दिली आहे. आता औद्योगिक महामार्ग १८० किमीऐवजी २१३ किमी लांबीचा असणार आहे. संरेखन अंतिम झाल्याने आता या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच भूसंपादन प्रक्रियेस सुरवात करण्यात येणार आहे.
राज्यभरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएसआरडीसीने ४२१७ किमी लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकीच एक पुणे – नाशिक औद्योगिक महामार्ग. अंदाजे २० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा महामार्ग पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने हाती घेण्यात आला आहे. या महामार्गाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने जून २०२३ मध्ये मोनार्च सर्व्हेअर अँड इंजिनीयरिंग कन्सल्टंट या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. या सल्लागाराकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून एमएसआरडीसीने महामार्गाच्या संरेखनासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावास राज्य सरकाने मंजुरी देत संरेखन अंतिम केले आहे. तर प्रकल्पास मान्यता देत प्रकल्प एमएसआरडीसीच्या माध्यमातून मार्गी लावण्यासही हिरवा कंदिल दिला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा : झोपडपट्टी योजनेतील शाळेचे, दवाखान्याचे आरक्षण अद्यापही गायब! अंतिम अधिसूचना अद्याप नाही!
अंतिम संरेखनानुसार आता हा महामार्ग १८० किमीऐवजी २१३ किमी लांबीचा असणार आहे. राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर या भागातून हा महामार्ग जाणार आहे. पुणे – शिर्डी साधारण लांबी १३५ किलोमीटर, शिर्डी आंतरबदल ते नाशिक – निफाड आंतरबदल (सुरत चेन्नई द्रुतगती महामार्गाचा भाग) साधारण लांबी ६० किलोमीटर व सुरत – चेन्नई द्रुतगती महामार्ग ते नाशिक (नाशिक – निफाड राज्य महार्गाचा भाग) साधारण लांबी १८ किलोमीटर असा एकूण २१३ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल. या महामार्गाचा आराखडा मंजूर झाल्याने आता लवकरच भूसंपादन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. भूसंपादन पूर्ण करत या वर्षाअखेरीस वा नववर्षाच्या सुरुवातील महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असल्याचेही या अधिकार्याने सांगितले.
हेही वाचा : मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर वसंत राणी बहरली
सुमारे ३७ किमी लांबीचे चार जोडरस्ते
पुणे – नाशिक औद्योगिक महामार्ग २१३ किमी लांबीचा असून ३७ किमी लांबीचे चार जोडरस्ते असणार आहेत. भोसरी जोडरस्ता ३.६७१ किमी, रांजणगाव जोडरस्ता २३.६३० किमी, राष्ट्रीय महामार्ग ६० जोडरस्ता ०.९२१ किमी आणि शिर्डी जोडरस्ता ८.७९० किमीचा असणार आहे. या जोडरस्त्यांमुळे पुणे वा नाशिकवरून भोसरी, शिर्डीला जात येणार आहे.