मुंबई : ‘आजचे, उद्याचे नाटक होतच राहील. पण नाटकाला आपल्याला हवे ते म्हणण्याचे, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असायला हवे,’ असे मत लेखक योगेश्वर बेंद्रे यांनी मांडले. मुंबईतील शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त आयोजित ‘आमचे उद्याचे नाटक : प्रायोगिक रंगभूमी’ या परिसंवादात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन शिंदे संवादित या परिसंवादात आलोक राजवाडे, प्रतीक्षा खासनीस, युगंधर देशपांडे आणि योगेश्वर बेंद्रे यांचा सहभाग होता. प्रायोगिक रंगभूमीच्या वेगवेगळ्या पैलूंवर या परिसंवादात चर्चा झाली. शेवटी आर्थिक गणितापाशी ही चर्चा येऊन थांबली. अर्थकारण जोवर जमत नाही तोवर प्रायोगिकतेची चाकोरी बदलणे अवघड आहे, या निष्कर्षाप्रत सगळे आले. प्रायोगिक म्हणजे गंभीरच काही तरी हेही समीकरण योग्य नाही. हसवणारी प्रायोगिक नाटके असू शकतात, असेही प्रतिपादन केले गेले. शहरी आणि ग्रामीण प्रेक्षक हा भेदही आपल्याला मान्य नसल्याचे प्रतीक्षा खासनीस यांनी सांगितले. कथा, कादंबरी आदींचे नाटकात माध्यमांतर अधिक प्रमाणात होते हे मान्य करून अस्सल नाटक जास्तीत जास्त लिहिले गेले पाहिजे, असे म्हणणेही यावेळी मांडले गेले. नव्या प्रायोगिक नाटकांसाठी नवी व्यासपीठे निर्माण केली गेली पाहिजेत यावर सहभागी वक्त्यांचे एकमत झाले. प्रायोगिक नाटक प्रस्थापिततेला धडक मारते का, हे पाहिले गेले पाहिजे, असे आलोक राजवाडे म्हणाले. प्रायोगिक नाटकाला, विचार करण्याला वलय यायला हवे, असेही मत त्यांनी मांडले. मी स्थलांतरित असल्याने अजूनही मला या शहरात परक्यासारखे वाटते, एकटेपण येते, असे युगंधर देशपांडे म्हणाले. तर आजूबाजूची परिस्थिती कितीही गंभीर असली तरी नाटकातून व्यक्त व्हायला मला आवडेल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.