मुंबई : बदलापूर येथे नुकताच एका ट्रॅक मेंटेनरचा धावत्या लोकलची धडक बसून मृत्यू झाला. मध्य रेल्वे प्रशासन ट्रॅकमॅनच्या अपघातांबाबत ठोस उपाययोजना करीत नाही. त्यामुळे ट्रॅकमॅनचे वारंवार अपघात होत आहेत, असा आरोप सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटेनर युनियनकडून करण्यात आला आहे.
६ जुलै रोजी सकाळी ११ च्या सुमारास कर्जतला जाणाऱ्या धावत्या लोकलने ट्रॅक मेंटेनर जनार्दन देशमुख यांना धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. बदलापूर येथे ते कीमन म्हणून काम करत होते. मुंबई विभागातील ही पहिलीच घटना नसून अशा घटना वारंवार घडत आहेत. परंतु, अशा घटनांची कारणे शोधण्यासाठी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. अशा घटना कशा घडतात, यावर काय उपाययोजना कराव्या याबाबत मध्य रेल्वे प्रशासन काहीही प्रयत्न करत नसल्याचे निदर्शनास येत आहे, असा आक्षेप युनियनने घेतला आहे.
हेही वाचा : मुंबई: सीएसएमटी येथे कार्यालयीन इमारतीचा छज्जा स्टाॅलवर पडला
मध्य रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अनेक ट्रॅक मेंटेनरचे लोकल अपघात झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी ट्रॅक मेंटेनरवरील कामाचा अतिरिक्त भार कमी करावा, त्यांच्या कामाव्यतिरिक्त इतर कामे त्यांना देवू नये, अशी मागणी युनियनने मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र पाठवून केली आहे.