मुंबईः बोरिवली पूर्व येथे दुचाकीने दिलेल्या धडकेत अन्वर मिठानी (६७) यांचा गुरूवारी मृत्यू झाला. निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सोमवारी २४ वर्षीय तरूणाला अटक केली. अन्वर मिठानी आणि त्यांचा मुलगा यश मिठानी यांचे बोरिवली पूर्व येथे ‘राजू कलेक्शन्स’ नावाचे चपलांचे दुकान आहे. बोरिवलीतच ते वास्तव्यास होते. दररोज ते दुचाकीवरून दुकानात जायचे.
१९ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घरी जात असताना पश्चिम द्रुतगती मार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. अनवर यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते खाली कोसळले. त्यात अन्वर यांचा उजवा गुडघा, चेहरा, उजवा कोपरा, उजवा घोटा, बोट आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या. यशच्याही हात-पायांला मार लागला. आरोपी त्यांना मदत न करताच पळून गेला.
हेही वाचा : शिवडी क्षयरोग रुग्णालयात दिवसाला दोन रुग्णांचा मृत्यू
काही नागरिकांनी यश यांना त्यांच्या वडिलांना शताब्दी रुग्णालयात नेण्यास मदत केली. तेथे त्याना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अनिकेत जाधव (२४) याला निष्काळजीपण आणि बेफिकिरीने वाहन चालवल्याच्या आरोपाखाली अटक केली. तो बोरिवलीतील रहिवासी आहे.