मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील छज्जाचा काही भाग शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास स्टाॅलवर पडला. ऐन गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सीएसएसएमटी येथील फलाट क्रमांक ६ आणि ७ वर मध्य रेल्वे प्रशासनाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या इमारतीच्या छज्जाचा काही भाग शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास अचानक स्टॉलच्या छतावर कोसळला. त्यामुळे स्टाॅलचे नुकसान झाले.
हेही वाचा : मुंबई: पालिका कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणूक कामासाठी रवानगी, प्रशासकीय कामकाज, सेवासुविधांवर परिणाम होणार
या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. अचानकपणे छज्जा पडल्यामुळे मोठा आवाज झाला आणि गोंधळलेले प्रवासी वाट मिळेल तेथे पळू लागले. यामुळे रेल्वे स्थानकात प्रचंड गोंधळ उडाला. घटनेचे वृत्त समजताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी, सुरक्षा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुर्घटनास्थळी रस्ता रोधक (बॅरिकेट्स) उभे केले. तसेच प्रवाशांना त्या भागातून ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असे सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.