मुंबई : दहिसर येथे १८ वर्षांच्या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून महिलेचा पती व सासूविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, कौटुंबिक हिंसा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्याचे दागिने व मोटारसायकलसाठी महिलेला शारिरीक व मानसिक त्रास दिल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ज्योती वडारी (१८) असे मृत महिलेचे नाव असून दहिसर पूर्व येथील केतकीपाडा परिसरातील घरात गुरूवारी साडीच्या साह्याने तिने गळफास घेतला. तिला शताब्दी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ज्योतीचे वडील मनोजकुमार रेड्डी यांनी याप्रकरणी दहिसर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार ज्योती यांचे पती कैलास वडारी व सासू अनंतमा वडारी यांच्याविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : मुंबई: गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल
जानेवारी महिन्यातच ज्योतीचा विवाह झाला होता. तक्रारीनुसार, काम केल्याशिवास सासू जेवण देत नसल्याचे ज्योतीने वडिलांना सांगितले होते. तसेच पतीने माहेरून मोटारसायकल व सासूने सोन्याचे दागिने आणण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला होता, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप ज्योतीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.