मुंबई: मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या काही रहिवाशांनी सोमवारी सायंकाळी रस्त्यावर तयार केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे १० ते १२ जणांना विषबाधा झाली असून यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ट्रोम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मानखुर्द परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : मुंबई: गोवंडी शताब्दी रुग्णालय ऑक्टोबरपर्यंत सज्ज होणार, रुग्णांना मिळणार अत्याधुनिक आरोग्य सुविधा

गेल्या काही वर्षांत मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील फेरीवाल्यांच्या संथ्येत प्रचंड वाढ झाली आहे. अनेक फेरीवाले रस्त्यालगत खाद्यपदार्थ शिजवून त्यांची विक्री करीत असतात. महाराष्ट्र नगरमधील एका फेरीवाल्याने तयार केलेले बर्गर सोमवारी सायंकाळी १० ते १२ जणांनी खाल्ले होते. अर्धा तासानंतर या सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी तत्काळ काहींना जवळच्या खासगी रुग्णालयात, तर काहींना पालिका रुग्णालयात दाखल केले. यापैकी अनेकांना उपचारानंतर रात्री उशिरा घरी पाठविण्यात आले. मात्र यापैकी प्रथमेश भोकसे या तरुणाचा मृत्यू झाला. प्रथमेशला पहिल्यांदा याच परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला केईएम रुग्णलयात दाखल करण्यात आले. केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रोम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Story img Loader