मुंबई : नरिमन पॉइंट येथील एनसीपीएमधील दिलीप पिरामल आर्ट गॅलरीत शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सहकार्याने ‘ट्रान्स – हार्बर ट्रायम्फ: द अटल सेतू स्टोरी इन पिक्चर्स’ नामक प्रदर्शन भरविले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सचे अध्यक्ष खुशरू एन. सॅनटूक, मुंबईतील जपानचे कॉन्सुलेट जनरल यागी कोजी, ‘जायका’चे मुंबई प्रतिनिधी मित्सुनोरी सायटो यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. हे प्रदर्शन १७ ते ३१ जुलैदरम्यान दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनात नागरिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
हेही वाचा : मुंबई: तीन वर्षांत नवे कर्करोग रुग्णालय, १६५ खाटांची व्यवस्था; २१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित
देशातील सर्वात लांब असा अटल सेतू जानेवारीपासून वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. अटल सेतू अभियांत्रिकी आविष्काराचा उत्तम नमुना मानला जात आहे. अटल सेतूच्या बांधणीसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या सेतूची बांधणी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच लोकार्पण आदींचा आढावा छायाचित्रांच्या माध्यमातून घेण्यात आला असून अटल सेतूच्या उभारणीचे दर्शन या प्रदर्शनात घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.