मुंबई : पवई येथील भीमनगर परिसरातील अनधिकृत झोपड्यांवर गुरुवारी सकाळी तोडक कारवाई करण्यासाठी गेलेले मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांवर संतप्त जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच, जमावाचा रोष पाहून पालिका प्रशासनाने निष्कासन कारवाई थांबवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या २५ वर्षांपासून भीम नगरात अनेक जण वास्तव्यास आहेत. तसेच, भीमनगर परिसरात २००५ मध्ये काही कामगारांना तात्पुरते संक्रमण शिबीर उभारण्यात आले होते. कालौघात तेथे झोपड्यांची संख्या वाढत मोठी वसाहत निर्माण झाली. संबंधित जागा शासकीय वसाहतीसाठी राखीव असल्याने पालिकेतर्फे अनेकदा अतिक्रमण हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले. येथील अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यासाठी गुरुवारी सकाळी पालिका कर्मचारी, पोलीस व संबंधित यंत्रणा भीमनगरात पोहोचल्या. मात्र, रहिवासी वस्तीच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी पालिका अधिकारी आणि पोलिसांना रोखले. उभयतांमध्ये बाचाबाची झाली. रहिवाशांनी पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांवर जोरदार दगडफेक केली. रहिवासी महापालिका आणि पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दगडफेकीत अनेक जण जखमी झाले.

हेही वाचा : वैद्यकीय उपचारासाठी आता आभा कार्ड आवश्यक, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय

दोन महिन्यांपूर्वी संबंधित परिसरात आग लागली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने या भागातील रहिवाशांना जागा रिकामी करण्याची नोटीस पाठवली होती. दरम्यान, पालिका अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस गुरुवारी निष्कासन कारवाईसाठी गेले असता रहिवाशांनी कडाडून विरोध करीत दगडफेक केली. आक्रमक झालेला जमाव आणि परिस्थिती चिघळण्याची चिन्हे निर्माण होताच महापालिकेने निष्कासन कारवाई थांबवली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai at powai stone pelting on police during anti encroachment drive many injured mumbai print news css