मुंबई : गेल्या आठवड्यात काही दिवस मुंबईमध्ये बहुतांश ठिकाणी हवेची गुणवत्ता मध्यम होती. मात्र दोन दिवसांपासून काही भागात हवेची गुणवत्ता ‘अतिवाईट’ ते ‘वाईट’, तर काही भागात ‘मध्यम’ असल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, समीर ॲपच्या नोंदीनुसार, गोवंडीमधील शिवाजी नगर येथे मंगळवारी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली आहे. वातावरणातील घतक पीएम २.५ आणि १० धुलिकणांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले असून तेथे मंगळवारी सायंकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक ३०६ होता. यामुळे अशा वातावरणात घराबाहेर पडणे घातक ठरू शकते.
मागील काही दिवस मुंबईतील सरासरी हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत होती. त्यानंतर रविवारी संपूर्ण मुंबईचा हवा निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत नोंदला होता. तर, काही ठिकाणी हवेची गुणवत्ता ‘अतिवाईट’ ते ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जात असून, शिवाजी नगरमध्ये मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५.३० च्या सुमारासही हवेची गुणवत्ता ‘अतिवाईट’च होती . येथे पीएम २.५ ची मात्रा अधिक होती. दरम्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना न केल्याने हवेत धूळ पसरण्याचे प्रमाण या परिसरात अधिक आहे. राडारोड्याची अवैध वाहतूक, तसेच कचराभूमीमधील कचरा जाळण्याचे वाढते प्रमाण यामुळे सतत प्रदूषण वाढत आहे. याअगोदरही अनेकदा शिवाजी नगरमधील हवेची ‘वाईट’ श्रेणीत नोंद झाली होती.
हेही वाचा : संरक्षण आस्थापनांपासून ५०० मीटरपर्यंत बांधकामांवरील निर्बंध शिथिल? पालिकेकडून परवानगी देण्यास सुरुवात
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक ० – ५० दरम्यान ‘चांगला’, ५१ – १०० दरम्यान ‘समाधानकारक’, १०१ – २०० दरम्यान ‘मध्यम’, २०१ – ३०० दरम्यान ‘वाईट’, ३०१ – ४०० दरम्यान ‘अतिवाईट’ आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे हवेची गुणवत्ता ‘अतिधोकादायक’ समजली जाते.
पीएम २.५ म्हणजे काय
हवेतील पीएम २.५ हे धुलीकणांची अतिघातक आहे. हे कण श्वास घेताना सहज नाक आणि तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. हे धूलीकण हृदयविकाराचा झटका, दमा तसेच श्वसनाच्या इतर समस्या निर्माण करतात. बांधकामस्थळी, रस्त्यावरील धूळ, डिझेल, वाहन, कारखान्यांतील उत्सर्जन यामुळे हे प्रदुषण होते.
समीर ॲपच्या नोंदीनुसार मंगळवारी सायंकाळी हवेचा निर्देशांक
घाटकोपर- २०३
वरळी- २११
शिवडी- २०९
वांद्रे-कुर्ला संकुल- १५२
चेंबूर- १८०
भायखळा- १५९