मुंबई : मुंबईमधील पूर्व द्रुतगती मार्गावर छेडा नगर – विक्रोळी दरम्यान दुभाजकावरील वसंत राणीची झाडे आता पूर्ण बहरास आली आहेत. मुंबईसारख्या शहरात निसर्गाची अशी उधळण क्वचितच पहावयास मिळते. निसर्गाची ही उधळण आणि परिसराचे पालटलेले रुपडे बघण्यासाठी निसर्गप्रेमी आवर्जून या भागात हजेरी लावत आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर – विक्रोळी या भागात व विशेष करून मार्गाच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकावर पर्यावरणाच्या व सुशोभिकरणाच्या दृष्टीकोनातून २०१८ मध्ये विविध झाडे लावण्यात आली होती. या झाडांमध्ये वसंत राणीचाही समावेश आहे. सुमारे २५ ते ३० फुट उंच असणाऱ्या या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. यावर्षीही आतापासून बहर आला असून फुलांनी डवरलेली वसंत राणीची झाडे नागरिकांचे व पुष्पप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. या झाडांचे वेळोवेळी आवश्यक ते परिरक्षण करण्याची कामे महापालिकेच्या उद्यान खात्यामार्फत करण्यात येत आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
हेही वाचा : Mauris Noronha: अभिषेक घोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस नोरोन्हा कोण होता?
मुंबईतील पर्यावरणाचे संवर्धन होण्यासोबतच सुशोभिकरणही साधले जावे, या दृष्टीने महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे वृक्षारोपण व वृक्ष जोपासना नियमितपणे केली जात असते. चार वर्षांपूर्वी झालेल्या वृक्षगणनेनुसार महापालिका क्षेत्रात सुमारे २९ लाख ७५ हजार २८३ एवढे वृक्ष आहेत. यामध्येच ६ हजार ५०० हून अधिक वसंत राणी वृक्षांचाही समावेश आहे. वसंत राणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या झाडाचे वनस्पतीय शास्त्रीय नाव ‘टॅब्यूबिया पेंटाफायला’ (Tabebuia Pentaphylla / Tabebuia Rosea) असे आहे. तर हे झाड इंग्रजीमध्ये ‘पिंक ट्रंम्पेट, पिंक पाऊल, पिंक टिकोमा’ या नावांनीही ओळखले जाते, अशीही माहिती परदेशी यांनी दिली.