मुंबई : मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’ला नागरिकांचा प्रतिसाद वाढत असून आपला दवाखाना सुरू झाल्यापासून अवघ्या २२ महिन्यांत ५७ लाखांहून अधिक नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. आता येत्या काही महिन्यांत ३७ नवीन आपले दवाखाने सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
मुंबईकरांना सहज आरोग्य सेवा मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून १७ नोव्हेंबर २०२२ रोजी पहिला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्याने त्यात वाढ करण्यात आली. अवघ्या २२ महिन्यांत मुंबईत २४३ दवाखाने सुरू करण्यात आले. या दवाखान्यातून आतापर्यंत ७५ लाखांहून अधिक नागरिकांनी वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला आहे. नागरिकांच्या सोयीच्या वेळेत आणि घराजवळ दवाखाने उपलब्ध असल्याने अधिकाधिक संख्येने मुंबईकर या वैद्यकीय सुविधांचा लाभ घेत आहेत. दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधांमध्ये पडणारी भर पाहता या दवाखान्यांना मिळणारा प्रतिसाद देखील वाढतो आहे. ही बाब लक्षात घेता नजीकच्या काळात आणखी ३७ दवाखाने सुरू करण्याचे नियोजन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: Mumbai Mega Block On Western Line : पश्चिम रेल्वेवर साडेसहा तासांचा ब्लॉक
सद्यस्थितीत आपला दवाखान्यांची एकूण संख्या २४३ इतकी आहे. तर आगामी काळात आणखी ३७ दवाखान्यांची भर पडणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या आपला दवाखान्यांपैकी, पोर्टकेबिन्समध्ये ८५, सुसज्ज इमारतीत १७, नियमित दवाखाने १०८ आणि पॉलिक्लिनिक्स ३३ याप्रमाणे दवाखाने कार्यरत आहेत. आरोग्य सुविधांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने झोपडीबहुल भागातील प्रत्येक २५ हजार लोकसंख्येसाठी एक दवाखाना तर अडीच लाख लोकसंख्येसाठी एक पॉलिक्लिनिक अशा पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यात येते, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.
दोन सत्रांमध्ये सुविधा
दोन सत्रांमध्ये दवाखान्याची सेवा रूग्णांसाठी उपलब्ध आहे. मोफत सल्ला, आजाराचे निदान आणि उपचार अशा त्रिसूत्रीवर आधारित या दवाखान्यांमध्ये सुविधा देण्यात येते. या दवाखान्यांच्या ठिकाणी सेवा पुरविण्यासाठी १ हजार १४० कर्मचारी कार्यरत आहेत.
आतापर्यंत आपला दवाखान्याचा लाभ घेतलेल्या नागरिकांची संख्या पाऊण कोटींपेक्षा अधिक म्हणजे ७६ लाख इतकी झाली आहे.
दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिका
हेही वाचा: Kala Ghoda In Mumbai : काळा घोडा परिसरात शनिवार रविवारी वाहनांना बंदी
दवाखान्यांमध्ये उपलब्ध आरोग्यसेवा
- खासगी डायग्नोस्टिक केंद्राद्वारे महानगरपालिका दरात एक्स रे, सोनोग्राफी, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी सुविधा.
- पॉलीक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दंतचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय चिकित्सक, त्वचारोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट अशा विविध तज्ज्ञांमार्फत मोफत सल्ला व उपचार.