मुंबई : रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या अवैध पार्किंगची समस्या मार्गी लावण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ५०० सुरक्षारक्षकांची सेवा घेण्यात येणार आहे.
हेही वाचा… मुंबई : डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर सहाय्यक दिग्दर्शकाकडे खंडणीची मागणी
महापालिकेने संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत रस्ते – पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच दुभाजकांची स्वच्छता, सार्वजनिक भिंती – कचराकुंड्यांची स्वच्छता, बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून रस्त्यांच्या कडेला अवैधरीत्या उभी केली जाणारी वाहने हटवण्यात येणार आहेत. अशा वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होण्यासह कचऱ्याची देखील समस्या निर्माण होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील अवैध पार्किंग समस्येवरही उत्तर शोधण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत. ही समस्या मार्गी लावण्यासाठी मार्शल्सची नेमणूक करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते, मात्र वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याचे अधिकार पालिकेला नाहीत त्यामुळे पालिकेने क्लीनअप मार्शल ऐवजी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचे ठरवले आहे.