मुंबई: मित्रांसोबत विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षांच्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना माहुल गावात घडली. याबाबत आरसीएफ पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. चेंबूरच्या माहुल गावात वास्तव्यास असलेला वेद तुर्भेकर १३ जून रोजी चार मित्रांसोबत गावातील विहिरीत पोहण्यासाठी उतरला होता. जवळच असलेल्या एका हॉटेल चालकाने विहिरीतील पाणी उपसण्यासाठी एक मोटार लावली होती. या मोटारीचा मुलाला शॉक लागला.
हेही वाचा : आदिवासी बहुल भागात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रसार, मुंबई विद्यापीठातर्फे विशेष कार्यशाळा
त्याच्या मित्रांनी तत्काळ ही माहिती वेदच्या वडिलांना दिली. त्यांनी तत्काळ वेदला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वेदच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करून हॉटेल चालकासह एकूण तिघांना अटक केली.