मुंबई : गुंतवणूकीसाठी पावणेचार कोटी रुपये घेऊन अपहार केल्यानंतर डी कंपनीच्या नावाने धमकी दिल्याप्रकरणी व्यावसायिकाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आाल आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. तक्रारदार महिला दुबईत राहत असून २०२१ मध्ये त्यांची ओळख नवी मुंबईतील वाशी येथील गुंतवणूकदार कंपनीच्या मालकाशी झाली. त्याने कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यांना वर्षाला १८ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. तक्रारदार महिला व तिच्या बहिणीला वारसा हक्कानुसार वडिलांकडून पैसे मिळाले होते. त्यावर कर भरावा लागणार होता. त्यामुळे सनदी लेखापालाने ती रक्कम चांगल्या ठिकाणी गुंतवण्यास सांगितले होते. त्यानुसार तक्रारदार महिलेने ती रक्कम वाशीतील आरोपी व्यावसायिकाकडे गुंतवण्याचे ठरवले.

त्यानुसार दोन्ही बहिणींनी आरोपी व्यावसायिकाकडे तीन कोटी ८५ लाख रुपये गुंतवले. ११ महिन्यानंतर त्यावर १८ टक्क्यांचा परतावा मिळणार होता. त्यानुसार तक्रारदार तेथे गेल्या असता आरोपीने व्यवसायात नुकसान झाल्यामुळे ती रक्कम आता देता येणार नाही. सहा महिन्यानंतर व्याजासह ती रक्कम परत करण्याचे मान्य केले. त्यानंतर २०२४ पर्यत तक्रारदार महिलेला रक्कम मिळाली नाही. त्यावेळी त्यांनी विचारणा केली असता आरोपीने आपण चित्रपटात रक्कम गुंतवल्याचे सांगितले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. पण तक्रारदारांनी दुबईतून त्यांना वारंवार दूरध्वनी करून धमकावले. त्यावेळी आरोपीने दुबईमध्येच तुला मारून टाकेन, दुबईतील सर्व गुंड माझ्या संपर्कात आहेत. दुबईत डी कंपनीची दहशत आहे, अशा शब्दात महिलेला धमकावले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.