मुंबई : काही वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘कुसुम मनोहर लेले’ नाटकाप्रमाणे बाळ दत्तक घेणाऱ्या महिलेचे नाव रुग्णालयात नोंदवून अवैध पद्धतीने दत्तक प्रक्रिया करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परळ येथील केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाची फसवणूक करून त्यांनी एका बालकाची अवैध दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गर्भवती महिला बाळ दत्तक घेणाऱ्या महिलेच्या नावाने रुग्णालयात भरती झाली होती. त्यामुळे बाळाच्या जन्म प्रमाणपत्रावर त्याला दत्तक घेणाऱ्या महिलेच्या नावाची नोंद झाली. हा बनाव यशस्वी झाला, पण बाळाची प्रकृती अचानक बिघाडल्याने वडिया रुग्णालयात त्याचे अपेंडिक्सचे ऑपरेशन करावे लागले आणि त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणात ठाण्यातील मानपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आणि रविवारी तो मुंबईच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. भोईवाडा पोलीस सध्या आरोपी महिला सुषमा पाटील (३८) (नाव बदलेले आहे) हिचा शोध घेत आहेत. ती फरार असून दत्तक घेणाऱ्या रुक्साना अली (३७) (नाव बदलले आहे) हिला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दोघीही ठाणे जिल्ह्यातील कल्याण (पूर्व) येथील रहिवासी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पाटील आणि तिचा पती यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. गेल्या वर्षी पाटील गर्भवती होती, पण तिच्या पतीच्या मद्यपानाच्या सवयींमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे तिला बाळ नको होते. तिने गर्भपातासाठी डॉक्टरांकडे आणि दवाखान्यात चकरा मारल्या. याचदरम्यान तिची ओळख रुक्सानाशी झाली. रुक्साना स्वतःच्या आरोग्याच्या समस्यांमुळे आई बनू शकत नव्हती आणि तिला मूल दत्तक घ्यायचे होते.

पाटील प्रसूती करेल आणि रुक्साना बाळ दत्तक घेईल, असे दोघींनी परस्पर समजुतीने ठरवले. मात्र, कायदेशीर प्रक्रियेनुसार, दत्तक द्यायच्या आधी मूल केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाकडे सोपवावे लागते आणि त्यानंतर ठरलेल्या निकषांनुसार पालकांची निवड केली जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि कठीण असल्याने त्यांनी नियम धाब्यावर बसवले. पाटीलने परळच्या केईएम रुग्णालयात रुक्सानाच्या नावाने दाखल झाली. रुग्णालय प्रशासनाची फसवणूक करताना तिने दाखल होते वेळी रुक्सानाची आधारकार्डची प्रत जमा केली आणि आपत्कालीन परिस्थिती असल्याचे भासवले. त्यामुळे ही फसवणूक रुग्णालयाच्या लक्षात आली नाही. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी पंडितने मुलीला जन्म दिला आणि तिचे नाव ‘रिदा अली’ (नाव बदललेले आहे) असे ठेवले. तिने तिच्या नावावरच जन्म प्रमाणपत्रही मिळवले. १५ ऑक्टोबर रोजी पाटील रुग्णालयातून घरी आली. तिने रुक्सानाला बाळ सुपूर्द केले. काही महिन्यांनी मुलीची प्रकृती अचानक बिघडली. रुक्साना १५ जानेवारी २०२५ रोजी तिला उपचारासाठी वडिया रुग्णालयात घेऊन गेली. तिच्या नावावर बाळाचे जन्म प्रमाणपत्र असल्याने तिला कोणतीही अडचण आली नाही. मात्र, ऑपरेशननंतर डॉक्टरांनी मुलगी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आणि तपासणीसाठी रुक्सानाला चाचणी करण्यास सांगितले. हे ऐकताच रुक्साना हादरली. ही मुलगी आपली नाही, तिला बाहेरून दत्तक घेतले आहे, असे तिने घाबरून डॉक्टरांना सांगितले. यानंतर वडिया रुग्णालयाने सखी केंद्र, मुंबई यांना याची माहिती दिली. ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधण्यात आला. ठाणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी आणि संस्थात्मक काळजी अधिकारी पल्लवी जाधव यांनी चौकशी करून या अवैध दत्तक प्रकरणाचा तपशील उघड केला. या प्रकरणी ठाणे महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात पाटील आणि रुक्साना यांच्याविरुद्ध बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम, २०१५ च्या कलम ८० आणि ८१ आणि भारतीय न्यायदंड संहिता कलम ३१८ (१), ३१८ (४), आणि ३( ५) अंतर्गत ‘शून्य एफआयआर’ नोंदवला. सध्या भोईवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Story img Loader